Onion Rate : राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर येत आहे. ही बातमी राज्यातील कांदा उत्पादकांसाठी अधिक खास राहणार आहे. कांदा हे महाराष्ट्रात उत्पादित होणारे एक महत्त्वाचे पीक आहे. या पिकाची नाशिक, अहमदनगर, पुणे, कोल्हापूर अशा विविध जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते.
कांदा लागवडीखालील क्षेत्र उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रात सर्वाधिक असल्याचे पाहायला मिळते. उत्तर महाराष्ट्रातील नाशिक आणि अहमदनगर हा जिल्हा कांदा उत्पादनासाठी संपूर्ण देशभरात प्रसिद्ध आहे.
दरम्यान नाशिक जिल्ह्यातून कांदा उत्पादकांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. ती म्हणजे नाशिक जिल्ह्यातील देवळा कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत येणाऱ्या निंबोळा येथील उपबाजारात उन्हाळी कांद्याला विक्रमी भाव मिळाला आहे.
खरेतर या उपबाजार आवाराचा नुकताच शुभारंभ झाला आहे. हा उपबाजार 11 मार्च 2024 ला सुरू झाला आहे. देवळा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नुकत्याच झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीत संचालक मंडळाने तालुक्यातील निंबोळा येथे उपबाजार सुरू करण्याच्या आश्वासन दिले होते.
यानुसार, देवळा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाने निंबोळा येथे उपबाजार सुरू केला आहे. यामुळे या परिसरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. दरम्यान, उपबाजार आवारात पहिल्याच दिवशी उन्हाळी कांद्याची आवक झाली.
यात उन्हाळी कांद्याला चांगला विक्रमी भाव देखील मिळाला आहे. बाजार समिती प्रशासनाच्या माध्यमातून उपलब्ध झालेल्या माहितीनुसार, उपबाजाराच्या आवारात पहिल्याच दिवशी उन्हाळी कांद्याला सर्वाधिक 3 हजार 1 रुपये प्रतिक्विंटल असा भाव मिळाला आहे.
निंबोळा येथील माजी सरपंच आणि प्रयोगशील शेतकरी जव्हार निकम यांच्या कांद्याला हा भाव मिळाला आहे. तसेच लखमापूर येथील सोनू बच्छाव यांच्या कांद्याला 2 हजार 1 रुपये असा भाव मिळाला आहे.
तसेच या बाजारात किमान 500 आणि सरासरी 1,600 रुपये प्रति क्विंटल या दरात उन्हाळी कांद्याची खरेदी झाली आहे. यामुळे परिसरातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण पाहायला मिळाले आहे.
खरंतर केंद्र शासनाने डिसेंबर 2023 च्या दुसऱ्या आठवड्यात कांदा निर्यात बंदीचा मोठा निर्णय घेतला. या निर्णयानुसार 31 मार्च 2024 पर्यंत कांदा निर्यात बंदी लागू करण्यात आली आहे. पण निर्यात बंदीचा हा निर्णय शेतकऱ्यांसाठी खूपच घातक ठरला असून तेव्हापासून कांद्याच्या किमती दबावत आहेत.
मात्र नुकत्याच काही दिवसांपूर्वी केंद्र शासनाने 64 हजार 400 टन कांदा आपल्या मित्र देशांना निर्यात करण्याचा निर्णय घेतला. यामुळे बाजार समितीमध्ये कांद्याचे भाव थोडेसे वाढले आहेत.