Onion Rate Pune Market Yard : या चालू वर्षात गेली कित्येक महिने कवडीमोल दरात कांदा विक्री केल्यानंतर ऑगस्ट महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात कांद्याच्या बाजारभावात विक्रमी वाढ झाली. मात्र कांदा बाजार भाव झालेली ही वाढ सरकारला काही रुचली नाही.
शेतकऱ्यांना दोन पैसे हाती येतील अशी आशा असतानाच सरकारने कांदा दर नियंत्रणात ठेवण्यासाठी एकाच वेळी तीन महत्त्वाचे निर्णय घेतलेत. सुरुवातीला नेपाळमधून कांदा आयात करण्यास परवानगी दिली. यानंतर केंद्रशासनाने बफर स्टॉक मधील तीन लाख मेट्रिक टन कांदा खुल्या बाजारात विक्रीसाठी परवानगी दिली.
एवढे करूनही कांदा बाजार भाव नियंत्रणात येणार नाही अशी शक्यता केंद्र शासनाला वाटली आणि म्हणूनच केंद्र शासनाने शेतकऱ्यांचा एक क्षणही विचार न करता कांदा निर्यातीसाठी 40% शुल्क आकारण्याचा तुघलगी निर्णय घेतला.या निर्णयामुळे शेतकऱ्यांमधून प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे.
राज्यातील शेतकरी बांधव या निर्णयाविरोधात आंदोलने करत आहेत. नासिक जिल्ह्यात तर बेमुदत काळासाठी कांद्याचे लिलाव बंद करण्यात आले आहेत. शेतकरी आणि व्यापारी हे नेहमी परस्पर विरोधी असतात मात्र या निर्णयाविरोधात हे दोन्ही वर्ग एकत्र आले आहेत.
केंद्र शासनाने घेतलेल्या या निर्णयामुळे कांद्याच्या बाजारभावात घट होऊ लागली आहे. पुणे मार्केट यार्डात देखील या निर्णयाची झळ पाहायला मिळाली आहे. गेल्या आठवड्यात कांद्याचा बाजार सुरळीत चालू असतानाच केंद्र शासनाने घेतलेला हा निर्णय कांदा बाजारात उलथापालथ घडवत आहे.
केंद्राने घेतलेल्या या निर्णयामुळे पुणे मार्केट यार्डात आवक घटू लागली आहे.गेल्या आठवड्यात 900 टनपर्यंत कांद्याची आवक होत होती मात्र आता 700 टन आवक होत आहे. या निर्णयानंतर पुणे मार्केट यार्डात कांद्याला 20 ते 22 रुपये प्रति किलो असा भाव मिळत आहे.
या निर्णयापूर्वी मात्र कांद्याला 28 ते 30 रुपये प्रति किलो असा भाव मिळत होता. अर्थातच सहा ते आठ रुपये प्रति किलो पर्यंतची आत्तापर्यंत घसरण झाली आहे. तसेच जर हा निर्णय मागे घेतला गेला नाही तर दरात आणखी घसरण होणार अशी भीती शेतकऱ्यांना वाटत आहे.