Onion Rate : लोकसभा निवडणुकीनंतर आता कुठे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळत आहे. निवडणुकीनंतर कांद्याचे बाजार भाव समाधानकारक पातळीवर पोहोचले आहेत. निवडणुकीआधी शेतकऱ्यांना अगदी कवडीमोल दरात आपला कांदा विकावा लागला आहे. निवडणुकीच्या काळात सरकारने कांदा निर्यात बंदी मागे घेण्याचा निर्णय घेतला. मात्र हा निर्णय घेताना सरकारने काही जाचक अटी देखील लावल्यात.
सरकारने कांदा निर्यातीसाठी 40% निर्यात शुल्क आणि किमान निर्यात मूल्य लागू केले. यामुळे निर्यात खुली असली तरी देखील अपेक्षित निर्यात होत नसल्याची तक्रार निर्यातदारांकडून केली जात आहे. दुसरीकडे सरकार नाफेड कडून कांदा खरेदी करत आहे मात्र नाफेड कडून खूपच तूटपुंजा दर मिळतोय.
असे असतानाही सध्या महाराष्ट्रासहित संपूर्ण देशभरातील बाजारांमध्ये कांद्याला चांगला दर मिळतोय. कांद्याला विक्रमी मागणी आली असल्याने बाजारभावात सुधारणा झाली आहे. अशातच आता एक थोडीशी चिंता वाढवणारी बातमी समोर येत आहे. ती म्हणजे अफगाणिस्तानचा कांदा पाकिस्तान मार्गे भारतात दाखल झाला आहे.
यामुळे शेतकऱ्यांच्या माध्यमातून अफगाणिस्तानचा कांदा भारतात दाखल झाला असल्याने आगामी काळात कांद्याचे भाव पडणार का असा मोठा सवाल उपस्थित केला जातोय. दरम्यान आता आपण याच संदर्भात थोडक्यात माहिती पाहणार आहोत. अफगाणिस्तानचा कांदा महाराष्ट्रातील विशेषतः नाशिक व आजूबाजूच्या परिसरातील शेतकऱ्यांचा वांदा करणार का हे आपण थोडक्यात समजून घेणार आहोत.
अफगाणिस्तानच्या कांद्यामुळे भारतीय बाजारांवर काय परिणाम होणार?
सध्या अफगाणिस्तान मध्ये कांद्याला कवडीमोल दर मिळतोय. दुसरीकडे आपल्या भारतात सध्या कांद्याला विक्रमी दर मिळू लागला आहे. याचाच फायदा घेऊन देशातील काही व्यापाऱ्यांनी अफगाणिस्तानचा कांदा मागवला आहे.
पंजाब मधील अमृतसर आणि दिल्लीच्या बाजारांमध्ये अफगाणिस्तानचा कांदा बऱ्यापैकी चमकू लागला आहे. विशेष म्हणजे आगामी काळात देशातील इतरही प्रमुख बाजारांमध्ये या कांद्याची एन्ट्री होण्याची शक्यता आहे. सध्या, राजस्थानचा कांदा हा संपला आहे आणि यामुळे मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रातील कांद्याची राजधानी दिल्लीत मागणी आहे.
यामुळे मध्यप्रदेश आणि महाराष्ट्रातील कांद्याची स्पर्धा अफगाणिस्तानच्या कांद्यासोबत होत आहे. हा कांदा खाजगी व्यापाऱ्यांनी भारतात आणला असून त्यांना तो 28 ते 30 रुपये प्रति किलो या दराने पोहोच मिळाला आहे. भारतात मात्र कांद्याचे दर 40 ते 50 रुपये प्रति किलो पर्यंत पोहोचले आहेत.
म्हणजेच अफगाणिस्तानचा कांदा हा व्यापाऱ्यांना स्वस्तात मिळतोय. यामुळे मात्र देशांतर्गत कांद्याचे बाजार भाव कमी होणार अशी भीती शेतकऱ्यांना वाटू लागली आहे. परंतु जाणकार लोकांनी अफगाणिस्तानचा कांदा हा स्वस्त असला तरी देखील चवीच्या बाबतीत आपल्या भारतातील कांदा हा सरस आहे.
अफगाणिस्तानच्या कांद्यापेक्षा भारताचा विशेषता आपल्या महाराष्ट्रातील आणि त्यातल्या त्यात नाशिक जिल्ह्यातील कांदा हा चवीला उत्कृष्ट आहे. यामुळे भारतीय बाजारात अफगाणिस्तानचा कांदा दाखल झालेला असतानाही भारताच्या कांद्याला अधिक मागणी आहे. अफगाणिस्तान मधून आतापर्यंत 200 टन कांदा भारतात दाखल झाला आहे.
हा कांदा अमृतसर आणि दिल्लीच्या बाजारांमध्ये आला असून हा कांदा ग्राहकांना 30 ते 32 रुपये प्रति किलो या दराने विकला जाणार अशी शक्यता आहे. यामुळे याचा परिणाम म्हणून महाराष्ट्रातील कांदा बाजार भाव कमी होतील आणि शेतकऱ्यांना फटका बसेल अशी भीती शेतकऱ्यांना भेडसावत आहे.