Onion Rate : राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. खरे तर, कांदा हे नाशिक, अहमदनगर, पुणे, सोलापूर, कोल्हापूरसह संपूर्ण खानदेश आणि मध्य महाराष्ट्रातील उर्वरित जिल्ह्यांमध्ये उत्पादित होणारे एक महत्त्वाचे नगदी पीक आहे. मराठवाडा, विदर्भ आणि कोकणातही या पिकाची कमी अधिक प्रमाणात लागवड केली जाते. कोकणात पांढरा कांदा उत्पादित होतो.
विदर्भात देखील नागपूर जिल्ह्यात पांढरा कांद्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. मध्य महाराष्ट्रात विशेषता नाशिक, अहमदनगर मध्ये तीनही हंगामात कांद्याचे उत्पादन होते. खरीप, लेट खरीप आणि रब्बी अशा तीनही हंगामात कांद्याचे उत्पादन घेतले जाते. मात्र कांदा बाजार भावात नेहमीच लहरीपणा पाहायला मिळतो.
कधी कांद्याला चांगला दर मिळतो तर कधी पिकासाठी आलेला खर्च सुद्धा भरून निघत नाही. लोकसभा निवडणुकीच्या आधी कांदा अगदी कवडीमोल दरात विकावा लागला. मात्र निवडणुकीनंतर परिस्थिती बदलली. आता कांद्याला बाजारात बऱ्यापैकी दर मिळतो. महत्वाचे म्हणजे निवडणुकीनंतर कांद्याचे बाजार भाव टिकून आहेत.
एवढेच नाही तर बाजार अभ्यासकांनी आगामी काळात कांद्याच्या बाजारभावात आणखी वाढ होईल असे म्हटले आहे. कृषी तज्ञांनी सांगितल्याप्रमाणे गेल्या वर्षी उन्हाळी हंगामात कांदा लागवड मोठ्या प्रमाणात घटली. कारण म्हणजे गेल्या वर्षी पावसाळ्यात महाराष्ट्रात फारच कमी पाऊस झाला होता. अनेक ठिकाणी दुष्काळ सदृश्य परिस्थिती होती.
अशा परिस्थितीत गेल्यावर्षी उन्हाळी कांदा लागवडीखालील क्षेत्र मोठ्या प्रमाणात कमी झाले. यामुळे उत्पादनात घट आली. गेल्यावर्षी उन्हाळी हंगामात जेवढा कांदा उत्पादित झाला होता त्यापैकी फक्त दहा टक्के कांदा सध्या शिल्लक आहे. कांदा चाळीत साठवलेला कांदा मोठ्या प्रमाणात खराब झाला यामुळे आता फारच कमी माल शेतकऱ्यांकडे शिल्लक आहे.
म्हणून बाजारात कांद्याची आवक दिवसेंदिवस घटत आहे. हेच कारण आहे की नाफेड चा कांदा बाजारात आल्यानंतरही शेतकऱ्यांच्या मालाला विक्रमी दर मिळतोय. मिळालेल्या माहितीनुसार जूनच्या आधी नाशिक जिल्ह्यातील बाजारांमध्ये दररोज एक लाख क्विंटल कांद्याची आवक होत होती.
मात्र सध्या जिल्ह्यातील बाजारांमध्ये दररोज फक्त ५० हजार क्विंटल कांद्याची आवक होत आहे. जिल्ह्यातील बाजारांमध्ये सध्या उन्हाळी कांद्याला 3800 ते 4 हजार 100 असा सरासरी दर मिळतोय. विशेष म्हणजे कांद्याचे आवक दिवसेंदिवस कमी होत असल्याने बाजार भाव आणखी सुधारत आहेत.
गेल्या वर्षी दुष्काळामुळे एक लाख साठ हजार हेक्टर क्षेत्रावर कांद्याची लागवड करण्यात आली होती. यातून जवळपास 55 लाख टन कांद्याचे उत्पादन झाले होते. यातील वीस ते पंचवीस टक्के कांद्याची विक्री काढणी झाली की लगेच होते. बाकीचा कांदा देखील आता जवळपास संपला आहे.
जिल्ह्यातील बहुतांशी शेतकऱ्यांकडील कांदा आता संपला आहे. यामुळे जोवर आता नवीन कांदा बाजारात येत नाही तोवर बाजारभाव असेच तेजीत राहणार अशी शक्यता आहे. नवीन लाल कांदा बाजारात आल्यानंतर बाजार भाव नियंत्रणात येतील. मात्र तोपर्यंत बाजार भाव तेजीतच राहतील. जवळपास डिसेंबर महिन्यापर्यंत बाजार भाव असेच चढे राहणार असा अंदाज देण्यात आला आहे.