Onion Rate : कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. खरंतर, लोकसभा निवडणुकीपूर्वी कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या संकटांचा सामना करावा लागला. कांद्याला अगदीच कवडीमोल दर मिळत होता. त्यामुळे शेतकऱ्यांना पिकासाठी आलेला खर्च देखील भरून काढता आला नाही.
परंतु, लोकसभा निवडणुकीनंतर हे चित्र पूर्णपणे पालटले. बाजार भावात सुधारणा झाली. कांद्याचे दर सातत्याने सुधारत आहेत. यामुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळतोय. महत्त्वाचे म्हणजे अजूनही कांदा निर्यातीसाठी सरकारने जाचक अटी कायम ठेवल्या आहेत. कांदा निर्यातीसाठी किमान निर्यात मूल्य आणि निर्यात शुल्क लागू आहे.
सरकारच्या या निर्बंधामुळे कांद्याची निर्यात मोठ्या प्रमाणात मंदावली आहे. मात्र असे असतानाही कांद्याचे दर सातत्याने वाढत आहेत. यामुळे जर कांदा निर्यातीसाठी लागू असलेले हे निर्बंध आणखी शिथिल झालेत तर कांद्याची निर्यात वाढेल आणि बाजारभावात आणखी वाढ होईल असे बोलले जात आहे.
हेच कारण आहे की, शेतकरी बांधव कांदा निर्यातीसाठी लागू असलेले जाचक निर्बंध मागे घेण्याची मागणी करत आहेत. आशिया खंडातील सर्वात मोठी कांदा बाजारपेठ अर्थातच लासलगाव एपीएमसी सह निफाड, मनमाड सारख्या नाशिक जिल्ह्यातील बहुतांशी बाजारांमध्ये कांद्याचे दर सुधारले आहेत.
गेल्या आठवड्याच्या तुलनेत नाशिक जिल्ह्यातील बाजारांमध्ये कांद्याच्या दरात पाचशे रुपयांपासून ते 650 रुपयांपर्यंतची वाढ नमूद करण्यात आली आहे. सध्या नाशिक जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये कांद्याला क्विंटलमागे 3390 ते 3550 रुपये एवढा दर मिळत आहे.
गेल्या आठवड्याच्या तुलनेत हे बाजार भाव जवळपास 600-650 रुपये अधिक आहेत. कांद्याचे दर वधारल्यामुळे गेल्या अनेक महिन्यानंतर आता कुठं शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. परिणामी, जिल्ह्यासहित संपूर्ण राज्यातील शेतकरी समाधान व्यक्त करत आहेत.
महाराष्ट्र राज्य कृषी पणन महामंडळाचा अधिकृत संकेतस्थळावरून प्राप्त झालेल्या माहितीनुसार काल 14 ऑगस्टला कांद्याचे आगार म्हणून ख्यातनाम असलेल्या नाशिक जिल्ह्यातील 15 बाजार समित्यांमध्ये 1 लाख 18 हजार 240 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक झाली होती.
जिल्ह्यातील एपीएमसी मध्ये कांद्याला किमान 1400 ते 1500 रुपये प्रति क्विंटल, कमाल 3560 ते 3690 आणि सरासरी 3390 ते 3550 असा भाव मिळाला आहे. कांद्याचे बाजार भाव वाढले असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळतो. मात्र याचा सर्वसामान्य ग्राहकांवर विपरीत परिणाम होत आहे. घाऊक बाजारात भाव वाढले असल्याने किरकोळ बाजारातही किमतीत वाढ झाली आहे.