Onion Rate : राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी बातमी हाती आली आहे. महाराष्ट्रातील काही बाजारांमध्ये कांद्याचे दर घसरले आहेत. खरीप हंगामातील लाल कांद्याचे बाजार भाव गेल्या काही दिवसांमध्ये तब्बल 1400 ते 1500 रुपयांपर्यंत कमी झाले आहेत. गेल्या आठवड्यापर्यंत कांद्याचे दर तेजीत होते. पण या आठवड्यात दर कमी झाले आहेत.
खरेतर, नोव्हेंबरअखेरपर्यंत राज्यातील बाजार समित्यांमध्ये आवक ही सर्वसाधारणचं राहिली. त्यामुळे मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी राहिला अन कांदा दर डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत तेजीत राहिले. खरीप कांदा पिकाला बसलेला फटका त्यामुळे उत्पादनात आलेली घट यामुळे मागणीनुसार बाजारात कांदा उपलब्ध होत नव्हता.
तसेच अनेक ठिकाणी खरीप हंगामातील लाल कांदा उशिरा काढण्यासाठी तयार झाला. त्याचा परिणाम म्हणून काही दिवस कांदा दर तेजीत राहीलेत. आता एका आठवड्यापासून मात्र कांदा बाजाराचे चित्र पूर्णपणे बदलले आहे. आठवडाभरापूर्वी कांदा आवक लिमिटेड होती म्हणून बाजारभाव तेजीत होते.
मात्र डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून कांदा आवक वाढत असून आता ती दरवर्षीच्या सर्वसाधारण पातळीवर पोहोचली आहे. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात प्रतिक्विंटल दर ३,५०० ते ३,७०० रुपयांदरम्यान दर स्थिर राहिलेत. मात्र आता दर जवळपास चौदाशे रुपयांनी कमी झाले आहेत.
आता याचा फटका कांदा उत्पादक शेतकऱ्यांना सहन करावा लागतोय. महाराष्ट्र राज्य कृषी पणन महामंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून उपलब्ध झालेल्या माहितीनुसार सोलापूर एपीएमसी मध्ये सध्या कांद्याला किमान १००, कमाल ५००० तर सरासरी २,०५० रुपये दर मिळत आहे.
मागील आठवड्याच्या तुलनेत क्विंटलमागे १,३५० रुपये घसरण झाली आहे. तसेच आशिया खंडातील सर्वात मोठ्या कांदा बाजारपेठात म्हणजेच लासलगाव येथे क्विंटलमागे दर १,३५० रुपयांनी कमी झालेत. तर पिंपळगाव बसवंत येथेही दर १,४५० रुपयांनी कमी झालेत.
लासलगाव एपीएमसी मध्ये कांदा आवकेत चढ-उतार सुरू आहे. परंतु पिंपळगाव बसवंत आणि सोलापूर एपीएमसी मध्ये गेल्या आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यात कांदा आवक वाढली असून याचाच परिणाम म्हणून या ठिकाणी बाजार भाव कमी झाले आहेत.
आवक वाढली असल्याने कांदा दर हळूहळू घसरत असल्याचे चित्र या ठिकाणी पाहायला मिळाले आहे. नाशिक, अहिल्यानगर आणि सोलापूर जिल्ह्यात कांद्याची आवक वाढू लागली आहे. गुजरात राज्यातील महूवा, भावनगर, गोंडल परिसर मध्य प्रदेशमधील सेंधवा परिसरात कांद्याची आवक वाढत आहे.
तसेच, भारतीय कांद्याच्या निर्यातीवर २० टक्के निर्यात शुल्क कायम असल्याने त्यांचा फटका मागणीला असल्याने दर कमी झाल्याचे चित्र आहे. कांद्याचे दर आता कमी होत असल्याने शेतकऱ्यांची चिंता मात्र आता वाढत चालली आहे.