Onion Rate : राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि अगदीच आनंदाची बातमी समोर येत आहे. कांदा हे एक प्रमुख कॅश क्रॉप म्हणून ओळखले जाते. हे नगदी पीक राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये लावले जाते आणि या पिकावर राज्यातील बहुतांशी शेतकऱ्यांचे अर्थकारण अवलंबून आहे. नाशिक अहिल्यानगर पुणे सोलापूर यांसारख्या जिल्ह्यांमध्ये या पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड होते.
मध्य महाराष्ट्रात या पिकाचे लागवडीखालील क्षेत्र विशेष उल्लेखनीय असून मराठवाडा आणि विदर्भात सुद्धा कांद्याची लागवड होते. राज्यातील शेतकरी बांधव कांद्याच्या विविध जातींची लागवड करतात. अशातच आता कृषी शास्त्रज्ञांनी शेतकऱ्यांसाठी कांद्याचा नवीन वाण विकसित केला आहे.
कांद्याची ही नवीन जात फक्त 85 दिवसात काढणीसाठी तयार होणार असून यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ होणार आहे. राष्ट्रीय फलोत्पादन संशोधन व विकास प्रतिष्ठान (एनएचआरडीएफ) या संस्थेने कांद्याचा हा नवीन वाण विकसित केला आहे.
या कांद्याच्या नवीन जातीला एल-८८३ असे नाव देण्यात आले आहे. आज आपण याच नव्याने विकसित झालेल्या जातीच्या विशेषता अगदी थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कांद्याच्या नवीन वाणाच्या विशेषता
राज्यातील शेतकरी बांधव कांद्याची लागवड ही खरीप, लेट खरीप आणि उन्हाळी हंगामामध्ये करतात. दरम्यान कृषी शास्त्रज्ञांनी विकसित केलेला नवीन एल 883 हा वाण खरीप आणि लेट खरीप या हंगामात लागवडीसाठी शिफारशीत करण्यात आलाय.
हा वाण नुकताच विकसित झाला असला तरीदेखील यावर गेल्या आठ वर्षांपासून संशोधनात्मक प्रक्रिया सुरू होती. म्हणजेच हा वाण तयार करण्यासाठी कृषी शास्त्रज्ञांनी तब्बल आठ वर्ष मेहनत घेतली आहे. कृषी तज्ञांनी सांगितल्याप्रमाणे, हा वाण जमिनीतील अतिरिक्त ओलाव्यास सहनशील आहे.
महत्त्वाचे म्हणजे या वाणाची कांद्याची रोपे तयार केल्यानंतर पुनर्लागवड केली की ८० ते ८५ दिवसांत या जातीचे पीक काढणीस तयार होते. या जातीचा कांदा हा आकर्षक व उभट गोल गडद लाल रंगाचा असतो.
या जातीपासून शेतकऱ्यांना हेक्टरी 300 ते 325 क्विंटल पर्यंतचे उत्पादन मिळू शकते. बेले कांदा म्हणजेच जोड कांदा निघण्याचे प्रमाण फारच कमी आहे. खरंतर खरीप आणि लेट खरीप हंगामातील कांद्याची साठवणूक क्षमता फारच कमी असते.
पण या जातीचा कांदा हा तीन महिने साठवला जाऊ शकतो असा दावा केला जात आहे. यामुळे खरीप आणि लेट खरीप हंगामात उत्पादित झाल्यानंतर जर कांद्याला भाव नसेल तर शेतकऱ्यांना काही दिवस या कांद्याची साठवणूक करता येणे शक्य होणार आहे.