Onion Rate : नुकताच विजयादशमी अर्थातच दसऱ्याचा पावन पर्व साजरा झाला आहे. साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त म्हणजेच विजयादशमीचा मुहूर्त. या मुहूर्तावर दरवर्षी नवीन हंगामातील लाल कांद्याची खरेदी सुरू होत असते. अनेक व्यापारी विजयादशमीच्या मुहूर्तावर नवीन हंगामातील कांदा खरेदीला सुरुवात करत असतात.
यानुसार यंदाही विजयादशमीच्या मुहूर्तावर नवीन लाल कांद्याची खरेदी सुरू झाली. मात्र यंदा खरीप हंगामातील लाल कांद्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्याने विजयादशमीच्या मुहूर्तावर नाशिक जिल्ह्यात लाल कांद्याची अपेक्षित आवक झालेली नसल्याची माहिती व्यापाऱ्यांनी यावेळी दिली आहे.
विजयादशमीच्या मुहूर्तावर दरवर्षीच्या तुलनेत यंदा लाल कांद्याची आवक फारच कमी झाली. दरम्यान, नाशिक जिल्ह्यातील उमराणे येथील खारीफाटा कांदा मार्केटमध्ये अर्थातच श्री रामेश्वर कांदा मार्केटमध्ये दसऱ्याच्या मुहूर्तावर विक्रीसाठी दाखल झालेल्या लाल कांद्याला कमाल 7 हजार 100 रुपये प्रति क्विंटल असा विक्रमी दर मिळाला.
खारीफाटा येथील बाजार समिती प्रशासनाच्या माध्यमातून समोर आलेल्या माहितीनुसार , देवळा तालुक्यातील महात्मा फुले नगर येथील श्री रामेश्वर कृषी मार्केटमध्ये १० बैलगाडी, ५६ पिकअप व ४८ ट्रॅक्टर अशा एकूण ११४ वाहनांतून एकूण १३०० क्विंटल आवक नमुद करण्यात आली होती.
विजयादशमीच्या मुहूर्तावर झालेल्या कांदा लिलावात नवीन लाल कांद्याला किमान 500, कमाल 7,100 आणि सरासरी चार हजार रुपये असा भाव मिळाला. विजयादशमीच्या दिवशी राज ट्रेडर्स यांनी लिलावाच्या मुहूर्ताला उच्चांकी प्रतिक्विंटल ७,१०० प्रति क्विंटल अशी बोली लावून शेतकरी किसन झिपा राठोड (रा. उमराणे) यांचा नवीन लाल कांदा खरेदी केला.
विजयादशमीच्या मुहूर्तावर नवीन लाल कांद्याला रामेश्वर मार्केट मध्ये मिळालेला हा दर जिल्ह्यातील सर्वोच्च भाव ठरला. यामुळे सध्या शेतकऱ्यांमध्ये अगदीच उत्साहाचे आणि प्रसन्न वातावरण आहे. मात्र असे असले तरी मुहूर्ताचा हा दर शेतकऱ्यांनी ग्राह्य धरू नये.
हा भाव मुहूर्ताच्या कांद्याला देण्यात आला आहे. यामुळे शेतकऱ्यांनी हा भाव ग्राह्य न धरता बाजारातील परिस्थितीचा आढावा घेऊन आपल्या कांद्याच्या विक्रीचे नियोजन आखावे असा सल्ला यावेळी जाणकारांनी दिला आहे.