Onion Rate Maharashtra : कांदा हे महाराष्ट्रात उत्पादीत केले जाणारे एक महत्त्वाचे पीक आहे. याची लागवड मध्य महाराष्ट्रात सर्वाधिक पाहायला मिळते. मराठवाडा आणि विदर्भातही याची लागवड होते. वास्तविक, कांद्याला नगदी पिकाचा दर्जा देण्यात आला आहे. मात्र हे पीक नगदी असले तरीही कांदा बाजाराचा लहरीपणा हा शेतकऱ्यांच्या मुळावर उठला आहे.
कधी कांद्याला खूपच चांगला दर मिळतो तर कधी अगदीच कवडीमोल दरात याची विक्री करावी लागते. यामुळे शेतकऱ्यांचेच नुकसान होते. शेतकऱ्यांच्या मते कांदा बाजारात सरकारचा मोठा हस्तक्षेप होत आहे.
यामुळे त्यांचे मोठे नुकसान होते. कांदा निर्यातीबाबतचे शासनाचे धोरण हे व्यापारी वर्गाला आणि ग्राहकांना केंद्रस्थानी ठेवून आखले जाते. पण या धोरणात शेतकऱ्यांचा कुठेचं समावेश होत नाही. यामुळे शेतकऱ्यांची चहुबाजूने कोंडी होते.
व्यापारी वर्ग शेतकऱ्यांची कोंडी करतो, सरकारही शेतकऱ्यांचीच कोंडी करतो. विशेष म्हणजे निसर्गही शेतकऱ्यांनाच वेठीस धरतोय. दरम्यान आता राज्यातील कांदा उत्पादकांसाठी एक चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे.
ती म्हणजे लोकसभा निवडणुकीनंतर तेजीत आलेले कांद्याचे बाजार भाव आगामी काळात घसरण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीआधी कांद्याला फारच कमी दर मिळत होता. मात्र निवडणुकीनंतर कांद्याची मागणी वाढली आणि बाजार भावात सुधारणा झाली आहे.
यामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून संकटात सापडलेल्या कांदा उत्पादकांना आता कुठं दिलासा मिळत आहे. बाजारात कांद्याला समाधानकारक दर मिळत असल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर देखील कमालीचे समाधान पाहायला मिळतय.
पण, येत्या काही दिवसात बफर स्टॉक मधील कांदा खुल्या बाजारात येणार अशी माहिती एका प्रतिष्ठित मीडिया रिपोर्ट मधून समोर आली आहे. नाफेड अन एनसीसीएफने साठवून ठेवलेला बफर स्टॉकमधील कांदा बाजारात आणण्याच्या हालचाली सुरू असल्याचे सांगितल जात आहे.
यासाठी काल नाफेडच्या व्यवस्थापकीय संचालकांनी नाशिक दौरा केला असल्याची बातमीही समोर आली आहे. पण या बाबत कमालीची गोपनीयता ठेवण्यात आली आहे.
खरं तर कित्येक महिने कवडीमोल दरात कांदा विक्री केल्यानंतर आता कुठे शेतकऱ्यांना समाधानकारक भाव मिळतोय. पण, आता नाफेड बफर स्टॉक मधील कांदा खुल्या बाजारात आणणार अशी माहिती समोर येत आहे.
जर समजा नाफेडने असा निर्णय घेतला तर कांद्याचे बाजार भाव कमी होण्याची शक्यता आहे. यामुळे नाफेड बफर स्टॉक मधील कांदा खरच खुल्या बाजारात आणणार का हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.