Onion Rate Maharashtra : लोकसभा निवडणुकीच्या आधी मंदीत असणारा कांदा बाजार आता तेजीत आला आहे. यामुळे कांदा उत्पादकांना गेल्या अनेक महिन्यांनंतर आता कुठे खऱ्या अर्थाने दिलासा मिळू लागला आहे. सध्या बाजारात कांद्याला 3 हजार रुपयांपेक्षा अधिकचा भाव मिळतोय. मागील आठवड्यात लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याला सरासरी 3420 प्रति क्विंटल असा दर मिळाला होता.
लोकसभा निवडणुकीच्या आधी कांद्याला खूपच कवडीमोल दर मिळत होता. त्यामुळे शेतकऱ्यांना पिकासाठी आलेला खर्च देखील भरून काढता आला नाही. पण, निवडणुकीनंतर कांद्याची मागणी वाढली. तसेच कांद्याची निर्यात सुद्धा बऱ्यापैकी होत आहे.
कांदा निर्यातीसाठी सरकारने काही जाचक अटी लावलेल्या आहेत मात्र या अटी असूनही कांद्याची निर्यात वाढली आहे. यामुळे बाजार भाव तेजीत आले आहेत. अशातच, मात्र नाफेड लवकरच बफर स्टॉकमधील कांदा बाजारात आणणार अशी बातमी समोर येत आहे.
यामुळे बाजारभाव आगामी काळात पडतील अशी भीती शेतकऱ्यांना आहे. दरम्यान, याच संदर्भात आता एक मोठी माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नाफेडचा बफर स्टॉक मधील कांदा पोळ्यानंतरच बाजारात येणार आहे.
नाफेडच्या अधिकाऱ्यांनी एका वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार, बफेर स्टॉक मधील कांदा हा 10 सप्टेंबर नंतरच बाजारात येणार आहे. यंदा दोन सप्टेंबरला बैलपोळ्याचा सण आहे. त्यामुळे बैलपोळ्या पर्यंत कांद्याचे बाजार भाव असेच राहतील अशी आशा आहे.
खरे तर नाफेड ने बफर स्टॉक मधील कांदा बाजारात उतरवण्यासाठी अधिकृतरीत्या कांदा वाहतुकीसाठी आणि कांदा गोणींसाठी टेंडर काढले आहे. हे टेंडर बैल पोळ्याला अर्थातच दोन सप्टेंबरला उघडले जाणार आहे. म्हणजेच बैलपोळ्यानंतरचं नाफेडचा कांदा बाजारात येणार आहे. नाफेड 2 सप्टेंबरला कांदा वाहतुकीसाठी आणि कांदा गोणींसाठीचे टेंडर काढणार आहे.
तरी संबंधित निविदा उघडल्यानंतर संबंधितांना वर्क ऑर्डर देण्यासाठी साधारणत: आणखी ७ ते ८ दिवसांचा कालावधी जाणार आहे. म्हणजेच नाफेड चा कांदा प्रत्यक्षात 10 किंवा 11 सप्टेंबरला बाजारात येऊ शकतो. यामुळे तोपर्यंत बाजार भाव कमी होणार नाहीत.
नाफेडचा कांदा बाजारात आला तर भाव पडतील का?
नाफेड एक लाख 57 हजार टन कांदा बाजारात उतरवणार आहे. दररोज सुमारे 700 ते 800 टन कांदा बाजारात उतरवला जाईल. नाफेड नाशिक जिल्ह्यातून दररोज चार ते सहा हजार टन कांदा खरेदी करत आहे. म्हणजेच नाफेड नाशिक जिल्ह्यातून दररोज जेवढा कांदा खरेदी करत आहेत त्याचा फक्त दहा ते बारा टक्का कांदा बाजारात उतरवणार आहे.
तसेच, कांद्याची निर्यात देखील आता बऱ्यापैकी सुरू झाली आहे. एवढेच काय तर ऑगस्ट अखेर बाजारात येणारा कर्नाटकातील लाल वेल्लोर कांदा यंदा खराब हवामानामुळे अजूनही बाजारात दाखल झालेला नाही. यामुळे नाफेड चा कांदा जरी बाजारात दाखल झाला तरी देखील कांद्याचे दर फारसे पडणार नाहीत असा विश्वास तज्ञांनी व्यक्त केला आहे.
तज्ञांच्या मते कांदा 25 ते 27 रुपये प्रति किलोच्या खाली जाणार नाही. म्हणजेच क्विंटल मागे पंचवीसशे ते 2700 एवढा सरासरी भाव कांदा उत्पादक शेतकऱ्यांना नाफेडचा कांदा दाखल झाल्यानंतरही मिळू शकणार आहे. यामुळे शेतकऱ्यांनी फारशी काळजी करण्याचे काही कारण नसल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.