Onion Rate Maharashtra : राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि थोडीशी चिंता वाढवणारी बातमी समोर येत आहे. खरे तर महाराष्ट्रात विविध पिकांची शेती होते. मात्र राज्यात कांद्याचे उत्पादन सर्वात जास्त घेतले जाते. राज्यातील उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ आणि कोकणात देखील कांदा लागवड केली जाते.
कोकणात प्रामुख्याने पांढरा कांदा लागवड होते. तसेच राज्यात खरीप, लेट खरीप आणि रब्बी या तिन्ही हंगामात कांद्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जात आहे. कांदा उत्पादनाच्या बाबतीत देशात आपल्या महाराष्ट्राचा मोठा सिंहाचा वाटा आहे.
दुसरीकडे, राज्यातील एकूण कांदा उत्पादनात उत्तर महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्याचा सर्वाधिक वाटा पाहायला मिळतो. जिल्ह्यातील कळवण, सटाणा, मालेगाव, देवळा या कसमादे भागात अन चांदवड, नांदगाव या तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात कांद्याचे उत्पादन होते.
मात्र गेल्या काही महिन्यांपासून कांद्याचे बाजारभाव रोडावलेले पाहायला मिळतं आहेत. प्रामुख्याने केंद्रातील मोदी सरकारने निर्यात बंदीचा निर्णय घेतल्यानंतर कांदा बाजार भाव कमी झाले असल्याचे वास्तव आहे.
डिसेंबर 2023 मध्ये केंद्रातील मोदी सरकारने 31 मार्च 2024 पर्यंत कांदा निर्यात बंदी लागू करण्याचा निर्णय घेतला. सरकारने घेतलेल्या या निर्णयानंतर बाजारभावात मोठ्या प्रमाणात घसरण पाहायला मिळाली.
अजूनही बाजारभाव दबावातच आहेत. विशेष म्हणजे राज्यातील नाशिक जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये एका आठवड्यातच कांद्याचे भाव आणखी पाचशे रुपयांनी घसरले असल्याची बातमी समोर आली आहे.
हाती आलेल्या माहितीनुसार, कांद्याचे आगार म्हणून संपूर्ण जगात ख्यातनाम असलेल्या नाशिक जिल्ह्यात उन्हाळ कांद्याच्या दरात गेल्या सहा ते सात दिवसांमध्ये मोठी घसरण नमूद करण्यात आली आहे.
जिल्ह्यातील बाजारांमध्ये ५०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत घसरण झाल्याने बळीराजा पूर्णपणे बेजार झाला आहे. खरेतर यंदा खत, बियाणे, रोप, लागवड, काढणी मजुरीचे दर गगनाला भिडलेले आहेत. कृषी निविष्ठांच्या आणि मजुरीच्या वाढलेल्या किमती यामुळे पीक उत्पादनाचा खर्च सातत्याने वाढत आहे.
त्यातच गेल्यावर्षी जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या मान्सून काळात पुरेसा पाऊस झाला नसल्याने जिल्ह्यातील अनेक भागातील विहिरींनी तळ गाठला आहे. पण, वाढीव उत्पादन खर्च करून, नैसर्गिक संकटांचा सामना करून अन अथक परिश्रमातून शेतकऱ्यांनी यंदा कांद्याचे उत्पादन घेतले आहे.
पण आता उन्हाळ कांद्याचे दर रोडावले आहेत. नाशिकमध्ये गेल्या आठवड्यात कांद्याला १ हजार ७५१ रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला होता, पण काल गुरुवारी बाजारभावात पाचशे रुपयांपर्यंतची घसरण झाली. काल उन्हाळ कांद्याला १ हजार १७५ रुपये प्रतिक्विंटल असा भाव मिळाला आहे.