Onion Rate Maharashtra : लोकसभा निवडणुकीच्या आधी कवडीमोल दरात विक्री होणारा कांदा निवडणुकीनंतर भाव खात आहे. महत्त्वाचे म्हणजे गेल्या काही दिवसांपासून कांद्याचे दर टिकून आहेत. यामुळे उत्पादक शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर मोठे समाधान आहे. उन्हाळी हंगामात ज्या भागांमध्ये गेल्या मान्सूनमध्ये चांगला पाऊस झाला होता तिथे कांद्याचे उत्पादन चांगले झाले आहे आणि तेथील कांद्याला आता चांगला दरही मिळत आहे.
पण, कांदा बाजारभावात सुधारणा झाली असल्याने एकीकडे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान आहे तर दुसरीकडे गेल्या तीन-चार दिवसांपासून नाफेडचा कांदा बाजारात उतरवला जाणार अशा चर्चा सुरू झाल्या असल्याने शेतकऱ्यांमध्ये संभ्रमअवस्था आहे.
आगामी काळात भाव पुन्हा पडणार की काय अशी भीती शेतकऱ्यांना सतावत आहे. नाफेडचा कांदा बाजारात आला तर कांद्याची उपलब्धता वाढेल आणि यामुळे बाजारभाव पडतील असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
बाजारातील समीकरणांनुसार पाहिलं तर मालाची उपलब्धता वाढल्यानंतर मालाचे भाव कमी होत असतात. म्हणून जर येत्या काही दिवसांनी नाफेडचा कांदा बाजारात आला तर बाजारभाव पडू शकतात ही शक्यता आहे. यामुळे या चर्चांनी उत्पादक शेतकरी थोडासा गोंधळला आहे.
अशा या परिस्थितीतच राज्यातील कांदा उत्पादकांसाठी एक थोडीशी दिलासादायक बातमी समोर आली आहे. कांद्याचे आगार म्हणून प्रसिद्ध असलेल्या नाशिक जिल्ह्यातील काही बाजारांमध्ये उन्हाळी कांदा चांगलाच भाव खात असल्याचे दिसत आहे.
जिल्ह्यातील कोणत्या बाजारात मिळतोय विक्रमी दर
पिंपळगाव एपीएमसी मध्ये उन्हाळी कांद्याला कमाल 4 हजार 100 रुपये प्रतिक्विंटल असा विक्रमी दर मिळाला आहे. उमराणे एपीएमसी मध्ये सुद्धा उन्हाळी कांद्याला कमाल चार हजाराचा भाव मिळाला आहे.
दुसरीकडे जिल्ह्यातील इतर बाजारांमध्ये कांद्याला तीन हजार सातशे रुपये प्रति क्विंटल ते 3800 रुपये प्रति क्विंटल या दरम्यान दर मिळतोय. महत्त्वाचे म्हणजे सध्याची कांद्याची उपलब्धता आणि मागणी पाहता भविष्यात बाजार भाव आणखी कडाडणार असे चित्र आहे.
मागणीच्या तुलनेत मालाची आवक कमी होत असल्याने भविष्यात दर आणखी वाढू शकतात असे म्हटले जात आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. खरे तर यंदाच्या खरीप हंगामातील लाल कांद्याची आवक होण्यास आणखी काही काळ वाट पहावी लागणार आहे.
दुसरीकडे कांद्याची मागणी सातत्याने वाढत आहे आणि आवक आता पुढे आणखी कमी होणार आहे. म्हणजेच नवीन माल जोवर बाजारात येत नाही तोवर बाजारात मालाची फारशी आवक होणार नाही.
यामुळे बाजार भाव पाच हजाराची शेंडी फोडणार असे दिसत आहे. अभ्यासाकांनी गेल्या पंधरा-वीस दिवसांपूर्वी म्हणजेच कांदा बाजारात तेजी आल्यानंतर बाजार भाव लवकरच चार हजारावर जाणार असे म्हटले होते.
यानुसार आता बाजार भाव 4000 पार गेले आहेत. आता अभ्यासकांचे असे म्हणणे आहे की बाजार भाव लवकरच 5000 ची शेंडी फोडणार आहेत. यामुळे जर अभ्यासकांचे हे म्हणणे खरे ठरले तर राज्यातील हजारो शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे.