Onion Rate Maharashtra : केंद्रशासनाने गेल्या महिन्यात कांदा निर्यातीसाठी 40% शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला. या आधी कांदा निर्यात करण्यासाठी शुल्क लागत नव्हते. गेल्या महिन्यात निर्यात शुल्क लावण्याचा निर्णय घेतल्यामुळे देशातून होणारी कांदा निर्यात मंदावली आहे. याचा परिणाम म्हणून कांदा दरवाढीला तुर्तास ब्रेक लागला आहे.
काही बाजारात बाजारभावात मोठी घसरण देखील झाली आहे. म्हणून सरकारने हा निर्णय घेतल्यानंतर लगेचच या विरोधात शेतकऱ्यांकडून आंदोलने करण्यात आली. विविध शेतकरी संघटनांनी आणि व्यापाऱ्यांनी शासनाच्या या निर्णयाचा निषेध केला. अनेकांनी तर केंद्र शासनाने अचानक घेतलेल्या या निर्णयावर आश्चर्य व्यक्त केले.
तसेच केंद्र शासनाकडून कांदा दर नियंत्रणात ठेवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याचे स्पष्टीकरण देण्यात आले. पण निर्णयाविरोधात शेतकऱ्यांची आक्रमक भूमिका पाहता आणि दिवसेंदिवस विरोधातील आंदोलन तीव्र होत असल्याने राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी या मुद्द्यावर तोडगा काढण्यासाठी दिल्ली दरबारी जाऊन केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांची भेट घेतली.
अमित शहा यांच्यासोबत देखील त्यांनी चर्चा केली. देवेंद्र फडणवीस यांनी देखील दूरध्वनी वरून केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांच्यासोबत चर्चा केली. या चर्चेनंतर केंद्र सरकारने 2410 रुपये प्रतिक्विंटल या दराने नाफेडच्या माध्यमातून कांदा खरेदी करण्याचा निर्णय घेतला.
नाफेड आणि एनसीसीएफकडून जवळपास दोन लाख मेट्रिक टन कांदा खरेदीचा निर्णय घेण्यात आला आहे. पण केंद्राने ठरवून दिलेल्या दरापेक्षा कमी दरात नाफेड कडून कांदा खरेदी सुरू असल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे. सध्या ‘नाफेड’ व ‘एनसीसीएफ’कडून कमी दराने खरेदी होत आहे.
नाशिक जिल्ह्यात काल नाफेड व एनसीसीएफ कडून मात्र 2100 ते 2200 रुपये प्रति क्विंटल या दरात कांदा खरेदी करण्यात आली. यामुळे शेतकऱ्यांमध्ये शासनाविरोधात पुन्हा एकदा रोष वाढत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार अहमदनगर जिल्ह्यात (२१०३.७२), बीड (२१०३.७२), छत्रपती संभाजीनगर (२२७४.), धाराशिव (२१८२.३३), पुणे (२४४०.८३), नाशिक (२२७४.८३), धुळे (२२७४.८२) या भावात नाफेडच्या आणि एनसीसीएफ च्या माध्यमातून कांदा खरेदी केली जात आहे.
यामुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या जखमेवर शासन मलम लावण्याऐवजी मीठ चोळत असल्याचे मत शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे. दरम्यान केंद्र शासनाची घोषणा पुन्हा एकदा पोकळ ठरली आहे.