Onion Rate Maharashtra : येत्या काही दिवसात कांद्याचे भाव आणखी वाढण्याची शक्यता आहे. सणासुदीच्या काळात कांद्याची मागणी वाढेल अन यामुळे बाजार भाव आणखी कडाडण्याची शक्यता आहे. नक्कीच नवरात्र उत्सवात कांद्याची मागणी कमी होते. कारण की नवरात्र उत्सवात हिंदू सनातन धर्मातील लोक कांदा खात नाहीत. मात्र असे असले तरी आगामी काही दिवस कांद्याच्या किमती कमी होणार नसल्याचे म्हटले जात आहे. यामुळे नक्कीच शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.
परंतु सर्वसामान्य ग्राहकांना कांदा चांगलाच रडवण्याची शक्यता आहे. खरंतर, सरकारने कांद्यावरील निर्यात शुल्क कमी केल्यानंतर कांद्याची निर्यात वाढली आहे. यामुळे देशांतर्गत कांद्याची उपलब्धता कमी होत आहे. हेच कारण आहे की आगामी काळात कांद्याच्या किरकोळ बाजारातील किमती शंभरी गाठतील असा विश्वास तज्ञांनी व्यक्त केला आहे. सध्या किरकोळ बाजारात कांदा 60 ते 80 रुपये किलोने विकला जात आहे.
काही दिवसांपूर्वीच सरकारने कांद्यावरील किमान निर्यात किंमत (MEP) मर्यादा काढून टाकली होती. याशिवाय कांदा निर्यातीसाठी आकारले जाणारे निर्यात शुल्क देखील कमी केले आहे. हे शुल्क 20 टक्क्यांनी कमी करण्यात आले आहे. सरकारच्या या पाऊलामुळे देशातून कांदा निर्यातीला प्रोत्साहन मिळेल, असे सरकारचे म्हणणे आहे.
याशिवाय कांदा निर्यात वाढल्यास शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढणार आहे. कारण की शेतकऱ्यांच्या कांद्याला आता चांगला दर मिळणार आहे. किंबहुना महाराष्ट्रासहित देशातील अनेक राज्यांमधील बाजार समितीमध्ये कांद्याचे बाजार भाव वाढले आहेत. मात्र, त्यामुळे देशांतर्गत किरकोळ बाजारात कांद्याचे भाव वाढू लागले आहेत.
गाझीपूर, ओखला आणि आझादपूर भाजीपाला मार्केट सहित दिल्लीतील सर्व भाजीपाला मार्केटमध्ये मध्य प्रदेश, महाराष्ट्र, राजस्थान, कर्नाटक येथून कांद्याचा पुरवठा केला जातो. कांदा व्यापारी श्रीकांत मिश्रा सांगतात की, तीन दिवसांपूर्वी बाजारात कांद्याचा घाऊक भाव ३५ ते ४५ रुपये किलो होता.
मात्र सरकारने कांदा निर्यात शुल्क 20 टक्क्यांनी कमी केले अन बाजारात कांद्याचे घाऊक दर किलोमागे पाच रुपयांनी वाढले आहेत. राज्यातील अनेक बाजारांमध्ये कांद्याचे दर पाच हजार रुपये प्रति क्विंटल पेक्षा अधिक झाले आहेत. सध्या राज्यात उन्हाळी कांद्याचे मोठ्या प्रमाणात आवक होत असून उन्हाळी कांद्याला पाच हजार रुपयांच्या आसपास भाव मिळत आहेत. सरासरी बाजार भाव देखील वाढले आहेत.
कांद्याचे बाजार भाव आणखी वाढणार का?
येत्या काही दिवसांत कांद्याचे दर आणखी वाढू शकतात. श्रीकांतच्या म्हणण्यानुसार नवीन पीक येण्यास वेळ आहे. सध्या महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातूनच कांद्याचा पुरवठा होत आहे. राजस्थानमधील साठा जवळपास संपला असून त्यामुळे कमी कांदा बाजारात येत आहे. त्याचवेळी एका व्यावसायिकाने सांगितले की, किरकोळ बाजारात कांद्याचा भाव 80 रुपयांपेक्षा जास्त आहे. येत्या काही दिवसांत कांद्याचे भाव 100 रुपये किलोपर्यंत जाण्याची भीती आहे. म्हणजेच सर्वसामान्य ग्राहकांना आगामी काळात कांदा चांगलाचं रडवणार आहे.
कांद्याचे बाजारभाव वाढण्याचे कारण
सरकारने अलीकडेच कांद्यावरील किमान निर्यात किंमत (MEP) मर्यादा हटवली आहे. आतापर्यंत कांद्यावरील एमईपी 550 डॉलर प्रति टन निश्चित करण्यात आला होता. परंतु परकीय व्यापार महासंचालनालयाने (DGFT) अधिसूचना जारी केली आहे आणि ती तात्काळ प्रभावाने आणि पुढील आदेशापर्यंत काढून टाकली आहे.
त्यामुळे कांदा निर्यात वाढणार आहे. कांद्याची निर्यात खुली केल्यानंतर देशात कांद्याचा तुटवडा निर्माण होणार आहे अन त्यामुळे कांद्याचे भाव वाढणार आहेत. नवीन कांद्याचे पीक येण्यास सुमारे दोन महिन्यांचा कालावधी लागणार आहे. जोपर्यंत नवीन कांदा बाजारात येत नाही तोपर्यंत बाजारात कांद्याची आवक कमी राहणार आहे.
एकीकडे कांदा निर्यात खुली झाली आहे तर दुसरीकडे आता बाजारातील कांदा संपणार आहे. त्यामुळे जोपर्यंत नवीन कांदा येत नाही तोपर्यंत बाजार भाव असेच राहणार अशी शक्यता आहे. म्हणजेच पुढील किमान दोन महिने कांद्याच्या किमती तेजीत राहण्याची शक्यता आहे.