Onion Rate Maharashtra : लोकसभा निवडणुकीआधी कांद्याचे दर दबावात होते. मात्र, निवडणुकीनंतर कांद्याची मागणी वाढली आणि बाजाराचे चित्र पलटले. निवडणुकीनंतर बाजारभाव चांगलेच कडाडले आहेत. वाढलेली मागणी आणि बाजारातील कांद्याचा अत्यल्प पुरवठा यामुळे बाजार भाव गेल्या काही दिवसांपासून टिकून आहेत.
दुसरीकडे कर्नाटक मध्ये ऑगस्टच्या अखेरीस येणारा लाल कांदा देखील अजून बाजारात आलेला नाही. त्यामुळे कांद्याचा तुटवडा अधिकच जाणवू लागला आहे. हेच कारण आहे की गेल्या काही दिवसांपासून कांद्याचे दर तेजीत आहेत.
काल तर राज्यातील चंद्रपूर गंजवड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याला सर्वाधिक 5500 प्रतिक्विंटल असा कमाल दर मिळाला आहे. मात्र आता लवकरच हे बाजारभाव घसरतील की काय अशी भीती व्यक्त होऊ लागली आहे.
याचे कारण म्हणजे नाफेड लवकरच बफर स्टॉक मधील कांदा बाजारात उतरवणार आहेत. खरंतर केंद्र सरकारच्या भाव स्थिरीकरण योजनेअंतर्गत नाफेड कडून पाच लाख टन कांदा खरेदी केला जाणार आहे. यातील सव्वादोन लाख टन कांदा खरेदी मागील महिन्यात आटोपली.
विशेष म्हणजे आता हा कांदा बाजारात उतरवला देखील जाणार आहे. केंद्राच्या ‘ग्राहक व्यवहार’ विभागाकडून याबाबतच्या सूचना नाफेडला मिळाल्या आहेत. ‘नाफेड’ कार्यालयाकडूनचं याबाबत माहिती देण्यात आली आहे.
नाफेडचा कांदा बाजारात दाखल झाल्यानंतर कांद्याची उपलब्धता वाढणार आहे. कांद्याची उपलब्धता वाढली तर दर कमी होतील अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.
गेल्या अनेक महिन्यांनंतर आता कुठे कांद्याचे दर वाढले आहेत. निवडणुकीच्या आधी अगदी कवडीमोल दरात शेतकऱ्यांना कांदा विकावा लागला असल्याने त्यांना उत्पादन खर्च देखील भरून काढता आला नाही.
पण आता बाजारभावात सुधारणा झाली आहे आणि यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळतोय. पण अशातच आता नाफेडचा कांदा बाजारात येणार अशा चर्चा सुरू आहेत. साधारणतः दहा ते 11 सप्टेंबरनंतर नाफेडचा कांदा बाजारात येणार आहे.
यामुळे नाफेडच्या कांद्याचा जो काही परिणाम होईल तो दहा तारखे नंतरच पाहायला मिळणार आहे. तथापि काही बाजार अभ्यासकांनी नाफेड चा कांदा बाजारात आल्यानंतरही बाजारभावावर फारसा परिणाम होणार नसल्याचे म्हटले आहे.
नाफेडचा कांदा बाजारात दाखल झाल्यानंतरही शेतकऱ्यांना सरासरी 2500 ते 2800 रुपये प्रतिक्विंटल दरम्यान बाजारभाव मिळू शकतो असे काही तज्ञांचे म्हणणे आहे. यामुळे नाफेड चा कांदा बाजारात आल्यानंतर त्याचा मार्केटवर काय परिणाम होतो, शेतकऱ्यांच्या मालाला काय भाव मिळतो हे पाहण्यासारखे ठरणार आहे.