Onion Rate Maharashtra : गेल्या दोन महिन्यांपासून लालभडक टोमॅटोने स्वयंपाकाची फोडणी महाग केल्यानंतर आता कांदा देखील सर्वसामान्यांच्या स्वयंपाकातील बजेट महाग करणार असे सांगितले जात आहे. खरंतर फेब्रुवारी ते जून या काळात कवडीमोल दरात कांदा विकल्यानंतर आता शेतकऱ्यांना दिलासा मिळत आहे.
विशेष म्हणजे कांदा दरात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. कांद्याचे बाजार भाव गेल्या महिन्याभरापासून वाढले आहेत. सध्या बाजारात कांदा 1500 ते 2000 रुपये प्रति क्विंटल एवढ्या सरासरी बाजार भावात विकला जात आहे. विशेष म्हणजे गेल्या दोन-तीन दिवसांपासून कांद्याचे कमाल बाजार भाव तीन हजार रुपये प्रति क्विंटल पर्यंत पोहोचले आहेत.
अशातच सणासुदीच्या काळात कांद्याच्या भावात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. कांद्याच्या किरकोळ दरात वाढ होणार आणि यामुळे सर्वसामान्यांना कांदा रडवणार असे सांगितले जात आहे.
मागणी आणि पुरवठा यामध्ये तफावत निर्माण होऊन सप्टेंबर महिन्यात कांद्याला किरकोळ बाजारात 55 ते 60 रुपये प्रति किलो पर्यंतचा भाव मिळू शकतो असा अहवाल नूकताच समोर आला आहे. विशेष म्हणजे या चालू महिन्याच्या अर्थातच ऑगस्ट महिन्याच्या अखेरपासूनच कांद्याची आवक कमी होऊन बाजारभावात वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, रब्बी हंगामातील कांद्याची अवकाळी पावसामुळे आणि गारपिटीमुळे साठवणूक क्षमता कमी झाली आहे. रब्बी कांद्याची साठवणूक क्षमता जवळपास एक ते दोन महिन्यांनी कमी झाल्याचे लक्षात घेऊन उत्पादक शेतकऱ्यांनी फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात मोठ्या प्रमाणात उन्हाळी कांद्याची विक्री केली.
यामुळे बाजारातुन रब्बी हंगामातील कांदा लवकरच संपणार असे सांगितले जात आहे. याचा परिणाम म्हणून सप्टेंबर महिन्यात कांद्याचे भाव वाढणार आहेत. मात्र असे असले तरी ऑक्टोबर महिन्यात पुन्हा एकदा कांद्याचे भाव कमी होतील.
ऑक्टोबर महिन्यात खरीप हंगामातील लाल कांद्याची आवक सुरू होणार असल्याने या महिन्यात पुन्हा एकदा कांद्याचे भाव घसरणार असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान कांद्याचे भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र शासनाच्या ग्राहक विभागाच्या माध्यमातून बफर स्टॉकमधील तीन लाख मेट्रिक टन कांदा खुल्या बाजारात विक्रीसाठी पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
याचा परिणाम म्हणून कांद्याचे दर कमी होतील अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. यामुळे आता केंद्र शासनाने हा निर्णय घेतल्यानंतरही कांद्याचे भाव विक्रमी वाढणार का हे विशेष पाहण्यासारखे राहणार आहे. निश्चितच पुढल्या महिन्यात जर कांद्याच्या भावात विक्रमी वाढ झाली तर शेतकऱ्यांची दिवाळीपूर्वीच दिवाळी होणार असल्याचे बोलले जात आहे.