Onion Rate Maharashtra : गेल्या दोन दिवसांपासून महाराष्ट्रात कांद्याच्या मुद्द्यावरून प्रचंड राजकारण तापले आहे. केंद्र शासनाने किरकोळ बाजारातील कांद्याच्या किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी कांदा निर्यातीचे शुल्क 40 टक्क्यांपर्यंत वाढवले आहे.
या आधी कांदा निर्यातीसाठी शून्य टक्के शुल्क होते. मात्र आता 40% शुल्क लावले असल्याने कांद्याची निर्यात मंदावणार आणि यामुळे बाजारभावात घसरण होणार असे सांगितले जात आहे. परिणामी राज्यातील शेतकरी शासनाच्या या निर्णयाविरोधात आक्रमक बनले असून राज्यात सर्वत्र शासनाच्या निर्णयाची होळी केली जात आहे.
शेतकऱ्यांकडून शासनाच्या या निर्णयाचा निषेध होत असून नासिक जिल्ह्यातील बाजार समित्या या पार्श्वभूमीवर बेमुदत काळासाठी बंद करण्यात आल्या आहेत. शेतकरी, शेतकरी संघटना तसेच विरोधी पक्ष या निर्णयामुळे सरकारला वेठीस धरत आहेत. राज्यात विविध ठिकाणी शेतकऱ्यांनी आंदोलने सुरू केली आहेत.
काही ठिकाणी कांद्याचे लिलाव हाणून पाडले जात आहेत. यामुळे सरकार बॅकफुटवर आले असून यावर तोडगा काढण्यासाठी आज राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे दिल्ली दरबारी रवाना झाले आहेत. दिल्लीला कृषिमंत्री मुंडे यांनी वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांची भेट घेतली आहे.
या भेटीदरम्यान राज्यातील कांदा उत्पादकांच्या प्रश्नासंदर्भात चर्चा झाली आहे. जपान दौऱ्यावर असलेले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील केंद्रीय स्तरावर राज्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न उपस्थित करून यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला आहे.
दरम्यान राज्य शासनाकडून करण्यात आलेल्या या पाठपुराव्यानंतर केंद्र शासनाने नाफेडच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी दोन लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करण्याचा निर्णय घेतला असून ही खरेदी आजपासून सुरू करण्यात आली आहे.
या खरेदीसाठी राज्यात नाशिक आणि अहमदनगर येथे विशेष खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे 2470 रुपये प्रति क्विंटल या दराने शेतकऱ्यांकडून या खरेदी केंद्रावर कांद्याची खरेदी होणार आहे.
एकंदरीत कांद्याच्या प्रश्नावर मुंबईपासून दिल्लीपर्यंत आणि शेतकऱ्यांच्या बांधापासून ते जापानपर्यंत सर्वत्र हालचाली वाढल्या आहेत. अशा परिस्थितीत केंद्र शासनाने 40% निर्यात शुल्क लागू केल्यानंतर महाराष्ट्रातील प्रमुख कांदा बाजारात कांद्याला काय भाव मिळत आहे? हे आज आपण जाणून घेणार आहोत.
कुठं मिळाला सर्वोच्च भाव
अमरावती फळ आणि भाजीपाला मार्केट : या मार्केटमध्ये आज कांद्याला सर्वोच्च भाव मिळाला आहे. या मार्केटमध्ये आज त्यांचे 339 क्विंटल आवक झाली होती आणि आजच्या लिलावात या बाजारामध्ये कांद्याला किमान एक हजार रुपये कमाल 4300 आणि सरासरी 2650 रुपये असा विक्रमी भाव मिळाला.
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती : या बाजारात 14,261 क्विंटल कांदा आवक झाली होती आणि किमान शंभर रुपये प्रति क्विंटल, कमाल 3300 रुपये प्रति क्विंटल आणि सरासरी 1250 रुपये प्रतिक्विंटल असा भाव मिळाला.
दौंड केडगाव कृषी उत्पन्न बाजार समिती : या बाजारात कांद्याला किमान 1400, कमाल 3000 आणि सरासरी 3200 रुपये प्रति क्विंटल एवढा भाव मिळाला आहे.
कुठे मिळाला कमी भाव
भुसावळ कृषी उत्पन्न बाजार समिती : या मार्केटमध्ये आज कांद्याला किमान एक हजार रुपये, कमाल 1800 रुपये आणि सरासरी 1500 रुपये एवढा भाव मिळाला आहे. पण या बाजारात आज केवळ तीन क्विंटल कांद्याची आवक झाली होती.
मलकापूर कृषी उत्पन्न बाजार समिती : आज या मार्केटमध्ये कांद्याला कमाल 2050, किमान 600 रुपये आणि सरासरी 1500 रुपये प्रति क्विंटल एवढा भाव मिळाला आहे.
पुणे खडकी कृषी उत्पन्न बाजार समिती : या बाजारात आज कांद्याला किमान एक हजार रुपये, कमाल 1800 रुपये आणि सरासरी 1400 रुपये एवढा भाव मिळाला आहे.
शेतकरी मित्रांनो येथे दिलेली माहिती ही महाराष्ट्र राज्य कृषी पणन महामंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून प्राप्त झालेल्या माहितीनुसार सादर करण्यात आलेली आहे. यामुळे कांदा बाजारात विक्री करण्यापूर्वी संबंधित बाजार समितीमध्ये चौकशी करणे आवश्यक बाब राहणार आहे.