Onion Rate Maharashtra : राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाचे आणि मोठे अपडेट समोर येत आहे. कांद्याच्या उत्पादनासाठी संपूर्ण जगात ख्यातीप्राप्त असलेल्या आणि कांद्याचे आगार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिक जिल्ह्यातील बाजारांमध्ये एका दिवसातच कांद्याच्या बाजारभावात मोठी वाढ झाली आहे.
जिल्ह्यातील बहुतांशी बाजारात क्विंटल मागे शंभर ते दोनशे रुपयांची वाढ नमूद करण्यात आली आहे. उन्हाळी कांद्याच्या बाजारभावात होणारी ही वाढ कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारी ठरत आहे. खरंतर, मध्यंतरी जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्याचे लिलाव बंद झाले होते.
व्यापाऱ्यांनी कांदा लिलाव बंद करण्याचे जाहीर केले होते. कांद्याचे लिलाव तब्बल 13 ते 14 दिवसांसाठी बंद करण्यात आले होते. यामुळे मोठ्या प्रमाणात कांद्याची कोंडी झाली होती आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांना देखील याचा मोठा फटका बसला होता.
मात्र आता जिल्ह्यातील बाजारांमध्ये कांद्याचे लिलाव पुन्हा एकदा पूर्ववत झाले असून बाजारभावात वाढ होत आहे. 4 ऑक्टोबरच्या तुलनेत 5 ऑक्टोबर रोजी झालेल्या लिलावात कांद्याला दीडशे ते दोनशे रुपये प्रतिक्विंटल पर्यंतचा अधिकचा भाव मिळाला आहे.
यामुळे जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे चित्र पाहायला मिळत आहे. नाफेडची खरेदी आणि बांगलादेशसह देशांतर्गत वाढलेल्या मागणीमुळे कांद्याच्या बाजारभावात वाढ होत असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.
कांद्याला बाजारात काय भाव मिळतोय ?
लासलगाव एपीएमसी : या मार्केटमध्ये कांद्याला 4 तारखेला 2050 रुपये एवढा सरासरी भाव मिळाला होता. मात्र 5 तारखेला भाव दीडशे रुपयांनी वाढलेत आणि 2200 प्रतिक्विंटल एवढा सरासरी भाव नमूद करण्यात आला.
विंचुर कृषी उत्पन्न बाजार समिती : या मार्केटमध्ये चार तारखेला 2050 रुपये प्रति क्विंटल एवढा भाव मिळाला होता. पण 5 तारखेला या मार्केटमध्ये 2250 रुपये प्रति क्विंटल एवढा भाव मिळाला.
नायगाव कृषी उत्पन्न बाजार समिती : या मार्केटमध्ये चार तारखेला 2 हजार आणि पाच तारखेला 2150 रुपये प्रति क्विंटल एवढा सरासरी भाव कांद्याला मिळाला आहे.
मनमाड कृषी उत्पन्न बाजार समिती : यां एपीएमसी मध्ये चार तारखेला 1900 रुपये आणि पाच तारखेला दोन हजार रुपये प्रति क्विंटल एवढा सरासरी भाव मिळाला.
पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समिती : या मार्केटमध्ये कांद्याला 4 तारखेला 2200 रुपये आणि पाच तारखेला 2350 रुपये प्रति क्विंटल एवढा सरासरी भाव मिळाला आहे.