Onion Rate Maharashtra : राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक मोठी गुड न्यूज समोर येत आहे. ती म्हणजे डाळिंबा पाठोपाठ आता कांद्याच्या बाजारभावातही विक्रमी वाढ होत आहे. वास्तविक गेल्या काही दिवसांपासून डाळिंबाच्या बाजारभावात मोठी वाढ होत आहे.
डाळिंबाला कधीही मिळालेला नव्हता एवढा ऐतिहासिक दर मिळत आहे. नुकत्याच काही दिवसांपूर्वी राहता कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये डाळिंबाला आठशे रुपये प्रती किलो भाव मिळाला होता. अशातच आता कांद्याच्या दरातही सुधारणा होत आहे. यामुळे राज्यातील डाळिंब उत्पादक आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये सध्या समाधानाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
खरंतर राज्यात डाळिंब आणि कांदा या दोन्ही पिकाचे नाशिक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. याव्यतिरिक्त राज्यातील इतरही जिल्ह्यांमध्ये या दोन्ही पिकाची मोठ्या प्रमाणात शेती होते. साहजिकच या पिकांवर शेतकऱ्यांचे सर्व अर्थकारण अवलंबून आहे. तूर्तास मात्र राज्यातील डाळिंब आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळत आहे.
खरतर, कांदा निर्यातीसाठी 40% शुल्क आकारण्याचा निर्णय घेतल्यानंतर काही काळ मंदीत गेलेला कांद्याचा बाजार आता पुन्हा एकदा रुळावर आला आहे. कांद्याला आज राज्यातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 1800 रुपये प्रति क्विंटल ते 3400 रुपये प्रति क्विंटल दरम्यान सरासरी भाव मिळाला आहे.
विशेष म्हणजे आज राज्यातील एका महत्त्वाच्या एपीएमसी मध्ये कांद्याला कमाल 5 हजार रुपये प्रति क्विंटल एवढा भाव मिळाला आहे. यामुळे शेतकऱ्यांचा आनंद गगनात मावत नसल्याचे चित्र आहे.
कोणत्या बाजारात मिळाला सर्वोच्च भाव
आज राज्यातील चंद्रपूर गंजवड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याला 5000 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. अर्थातच कांद्याला तब्बल पन्नास रुपये प्रति किलो एवढा भाव मिळाला आहे. यामुळे निश्चितच शेतकऱ्यांना दिलासा मिळत आहे.
महाराष्ट्र राज्य कृषी पणन महामंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्राप्त झालेल्या माहितीनुसार आज चंद्रपूर गंजवड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 320 क्विंटल कांद्याची आवक झाली होती.
या मार्केटमध्ये आज कांद्याला किमान 2500 रुपये प्रति क्विंटल, कमाल 5000 रुपये प्रति क्विंटल आणि सरासरी 3400 रुपये प्रति क्विंटल एवढा भाव मिळाला आहे.