Onion Rate Maharashtra : लोकसभा निवडणुकीनंतर कांद्याचे बाजार भाव वाढलेत. राज्यातील अनेक महत्त्वाच्या बाजारात कांदा दरात सुधारणा झाली आहे. महत्त्वाचे म्हणजे गेल्या काही दिवसांपासून कांद्याचे दर टिकून आहेत. कांद्याचे बाजारभाव जवळपास 5000 रुपये प्रति क्विंटल पर्यंत पोहोचलेत. पण, ही दरवाढ केंद्र सरकारच्या नजरेत चांगलीच खुपली आहे.
बाजारभावात वाढ झाल्याने कांदा उत्पादकांना दिलासा मिळाला होता. गेली अनेक महिने कवडीमोल दरात कांदा विक्री केल्यानंतर कांद्याला समाधानकारक दर मिळत असल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे भाव पाहायला मिळत होते.
पण आता किरकोळ बाजारातील कांद्याच्या किमती नियंत्रणात राहाव्यात यासाठी नाफेडचा बफर स्टॉक मधील कांदा खुल्या बाजारात विक्रीसाठी उतरवला जात आहे. फक्त 35 रुपये प्रति किलो या दराने हा कांदा विक्री होण्याची शक्यता आहे.
एनसीसीएफ आणि नाफेड या दोन्ही सरकारी संस्थांनी जवळपास पाच लाख मेट्रिक टन कांदा खरेदी केला असून आता हा कांदा बाजारात येणार आहे. नाफेड अन एनसीसीएफ नाशिक जिल्ह्यातून दिल्लीसह देशातील विविध भागांमध्ये कांदा पाठवणार आहे.
या निर्णयामुळे मात्र कांद्याची उपलब्धता वाढून बाजारभावात घसरण होण्याची भीती आहे. दरम्यान, नाफेडचा कांदा बाजारात पोहचत नाही तोच बाजारभावात घसरण सुद्धा सुरु झाली आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, नाफेड ज्या ठिकाणाहून कांदा खरेदी करते तेथे कांदा विकू शकत नाही.
यानुसार, नाशिक जिल्ह्यातून नाफेडने कांदा खरेदी केला असल्याने जिल्ह्यात नाफेडच्या कांद्याच्या विक्री होणार नाहीये. पण, तरीही जिल्ह्यातील बहुतांशी बाजारांमध्ये कांद्याचे भाव पडले आहेत. आशिया खंडातील सर्वात मोठी कांदा बाजारपेठ अर्थातच लासलगाव एपीएमसी मध्ये कांदा बाजार भावात तब्बल सातशे रुपयांची घसरण झाली असल्याची माहिती समोर आली आहे.
लासलगाव एपीएमसी मध्ये आज सकाळच्या सत्रात झालेल्या लिलावात कांद्याला कमाल 4001, किमान 1500 आणि सरासरी 3800 रुपये प्रति क्विंटल असा भाव मिळाला आहे. पण, दोन दिवसांपूर्वी अर्थातच 3 सप्टेंबरला झालेल्या लिलावात लासलगाव एपीएमसी मध्ये कांद्याला कमाल 4700, किमान 2000 आणि सरासरी 4 हजार 100 असा विक्रमी दर मिळाला होता.
म्हणजे अवघ्या काही तासांच्या काळातचं लासलगाव येथे कांद्याचे बाजार भाव 700 रुपयांनी घसरले आहेत. दुसरीकडे, लासलगाव एपीएमसी सारखीच परिस्थिती नाशिक जिल्ह्यातील उर्वरित बाजारांमध्येही पाहायला मिळाली. यामुळे सध्या राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये पुन्हा एकदा तीव्र नाराजीचे पडसाद उमटू लागले आहेत.
गेल्या लोकसभा निवडणुकीत कांदा उत्पादकांच्या नाराजीमुळे प्रमुख कांदा उत्पादक पट्ट्यात सत्ताधारी पक्षातील अनेक उमेदवारांना पराभवाचा सामना करावा लागला होता. यामुळे आता येत्या विधानसभा निवडणुकीतही कांदा उत्पादकांची ही नाराजी पुन्हा एकदा सत्ताधाऱ्यांना जड भरणार का? हे पाहणे उत्सुकतेचे राहणार आहे.