Onion Rate Maharashtra : कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची अन थोडी चिंता वाढवणारी बातमी समोर येत आहे. खरे तर दहा दिवसांपूर्वी कांद्याचे दर तेजीत होते मात्र फक्त दहा दिवसांच्या काळातच कांद्याचे दर मोठ्या प्रमाणात आपटले आहेत. गुजरात आणि आंध्र प्रदेश राज्यात कांद्याचे उत्पादन वाढले असल्याने याचा परिणाम महाराष्ट्रातील कांद्याच्या बाजारात पाहायला मिळतोय.
सोलापूर एपीएमसी मध्ये कांद्याचे दर गेल्या दहा दिवसांच्या काळात मोठ्या प्रमाणात कमी झाले आहेत. दहा दिवसांपूर्वी सोलापूर एपीएमसी मध्ये कांद्याला विक्रमी सात हजार रुपयांचा कमाल भाव मिळाला होता. मात्र सोलापूर एपीएमसी मध्ये आज कांद्याला कमाल साडेचार हजार रुपयांचा भाव मिळाला आहे.
महाराष्ट्र राज्य कृषी पणन महामंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, नोव्हेंबर महिन्यामध्ये सोलापूर एपीएमसी मध्ये कांद्याला कमाल सात ते आठ हजाराचा भाव मिळाला होता. तेव्हा सरासरी दरही चांगला होता, त्यावेळी सरासरी दर ४००० ते ५००० रुपयांच्या दरम्यान होता.
तसेच, डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यातही कमाल दर सात हजार ते साडेसात हजार आणि सरासरी दर ३००० ते ३५०० रुपये होता. 10 डिसेंबर 2024 नंतर मात्र कांदा दरात घसरण सुरू झाली. तसेच, बाजारभावात सुरू झालेली घसरण आता थांबायला तयार नाही.
१२ डिसेंबरपर्यंत कमाल दर ६००० रुपयांपर्यंत होता. 14 डिसेंबरला कांद्याला कमाल 5000 ते 5400 असा भाव मिळाला. यानंतर मात्र कांद्याच्या दरात आणखी घसरण झाली. कांद्याचे कमाल बाजार भाव तब्बल चार हजार सहाशे रुपयांपर्यंत खाली आले आहेत. सरासरी बाजार भाव देखील 3500 रुपयांवरून थेट 1800 रुपयांवर आले आहे.
विशेष बाब अशी की पुढील महिनाभर दरातील ही घसरण अशीचं सुरू राहणार आहे. कांद्याच्या बाजारभावात सातत्याने घसरण होत आहे आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसत असून पिकासाठी आलेला खर्च देखील आगामी काळात भरून निघणार नाही अशी शक्यता आहे.