Onion Rate Hike : राज्यात खरीप, रब्बी आणि उन्हाळी अशा तीनही हंगामात कांद्याची लागवड केली जाते. राज्यातील कांदा लागवडीखालील क्षेत्र विशेष उल्लेखनीय आहे. राज्यातील जवळपास सर्वच जिल्ह्यात कमी अधिक प्रमाणात कांद्याची लागवड होते. वास्तविक कांद्याला नगदी पिकाचा दर्जा आहे.
पण कांद्याच्या बाजारभावात कायमच लहरीपणा पाहायला मिळतो. कधी कांद्याला खूपच चांगला भाव मिळतो तर कधी रद्दीपेक्षाही कमी भावात कांदा विकला जातो. यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कांदा हे पीक जुगाराप्रमाणेच भासू लागले आहे. या चालू वर्षात देखील फेब्रुवारी ते जून महिन्याच्या काळात कांद्याला खूपच कमी भाव मिळाला होता. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते.
आता मात्र गेल्या महिन्याभरापासून कांद्याच्या बाजारभावात चांगली सुधारणा पाहायला मिळत आहे. कांदा बाजार तेजीत आला असल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. अशातच, कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक खुशखबर समोर येत आहे. ती म्हणजे कांद्याच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता जाणकारांनी व्यक्त केली आहे. यामुळे शेतकऱ्यांना साहजिकच दिलासा मिळणार आहे. परंतु सर्वसामान्यांचे स्वयंपाक घरातील बजेट यामुळे कोलमडणार आहे.
खरंतर टोमॅटोच्या भावात आलेल्या तेजीमुळे सर्वसामान्य लोकांचे किचनमधील बजेट आधीच हाताबाहेर गेले आहे. आता पुन्हा एकदा कांद्याच्या दरात वाढ होणार असा अंदाज असल्याने सर्वसामान्यांची स्वयंपाकाची फोडणी महागणार आहे. दरम्यान आज आपण कांद्याच्या भावात वाढ होण्याची कारणे काय राहतील आणि केव्हा पर्यंत कांद्याचे भाव वाढतील याबाबत थोडक्यात जाणून घेणार आहोत.
क्रिसिल नामक एका संस्थेने कांद्याच्या दरात वाढ होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. याबाबत त्यांनी एक रिपोर्ट तयार केला आहे. या रिपोर्टमध्ये देण्यात आलेल्या माहितीनुसार, सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला बाजारात कांद्याची आवक कमी होणार असा अंदाज आहे. साहजिक आवक कमी झाली तर बाजारात कांद्याच्या दरात वाढ होणार आहे.
या रिपोर्ट मध्ये असा दावा करण्यात आला आहे की किरकोळ बाजारात कांद्याचे भाव तब्बल 70 रुपये प्रति किलोग्रॅमपर्यंत वाढू शकतात. मात्र असे असले तरी बाजारातील हे तेजी जास्त काळ टिकणार नाही आणि ऑक्टोबर महिन्यात पुन्हा बाजारभावात घसरण होणार असे या रिपोर्ट मध्ये सांगितले गेले आहे.
या रिपोर्ट मध्ये ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून बाजारात कांदा आवक कमी होणार असा अंदाज बांधण्यात आला आहे. याचाच अर्थ येत्या 15 ते 20 दिवसात बाजारात कांदा दरात तेजी येणार आहे. खरंतर बाजारात सध्या रब्बी हंगामातील कांद्याची आवक होत आहे. ही आवक सप्टेंबर पर्यंत सुरू राहणार आहे. दरम्यान रब्बी हंगामातील कांद्याची सेल्फ लाइफ वाढत्या तापमानामुळे कमी झाली आहे.
रब्बी कांदा सहा महिन्यापर्यंत टिकतो मात्र हवामानातील बदलामुळे हा कांदा चार ते पाच महिनेच टिकणार असा अंदाज आहे. यामुळे शेतकऱ्यांनी रब्बी हंगामातील कांदा लगोलगच विक्री करण्यास प्राधान्य दिले आहे. यामुळे या महिन्याच्या अखेरपासून कांद्याची आवक कमी होणार आणि दरात वाढ होणार असा अंदाज आहे. मात्र ऑक्टोबर महिन्यात खरीप हंगामातील कांदा बाजारात येईल आणि पुन्हा एकदा कांद्याची आवक वाढेल आणि त्यावेळी पुन्हा कांद्याचे बाजार भाव घसरतील असं सांगितलं जात आहे.