Onion Rate Hike : कांदा हे महाराष्ट्रासहित देशातील अनेक राज्यांमध्ये उत्पादित होणारे एक महत्त्वाचे पीक आहे. या पिकाची आपल्या महाराष्ट्रात कमी-अधिक प्रमाणात का होईना पण सर्वत्र लागवड केली जात आहे. राज्यातील उत्तर महाराष्ट्रातील अहमदनगर, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव याशिवाय पश्चिम महाराष्ट्रातील तथा मराठवाडा आणि विदर्भातील बहुतांशी शेतकऱ्यांचे कांद्यावर अर्थकारण अवलंबून आहे.
मात्र असे असले तरी गेल्या काही दिवसांपासून कांदा बाजार भाव दबावात आहेत. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात केंद्रातील मोदी सरकारने किरकोळ बाजारात कांद्याच्या किमती विक्रमी वाढले असल्याने कांदा निर्यात बंदीचा मोठा निर्णय घेतला होता. डिसेंबर 2023 मध्ये केंद्राने घेतलेल्या निर्णयानुसार 31 मार्च 2024 पर्यंत कांदा निर्यात बंदी लागू राहणार आहे.
यामुळे कांद्याचे बाजार भाव दबावात आले आहेत यात शंकाच नाही. राज्यातील अनेक बाजारांमध्ये कांदा कवडीमोल दरात विकला जात आहे. परिस्थिती एवढी बिकट बनली आहे की पिकासाठी आलेला खर्च देखील आता भरून निघेल अशी शाश्वती शेतकऱ्यांना राहिलेली नाही. अशातच, मात्र शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी समोर येत आहे.
ती म्हणजे नजीकच्या भविष्यात कांदा बाजार भावात सुधारणा होण्याची शक्यता आहे. याचे कारण म्हणजे 31 मार्च 2024 ला कांदा निर्यात बंदी उठवली जाणार आहे. केंद्र शासनाने 31 मार्च नंतर कांदा निर्यात बंदी लागू राहणार अशी अधिसूचना काढलेली नाही. याचा अर्थ असा की, 31 मार्च नंतर कांदा निर्यात बंदी उठवली जाऊ शकते.
असे झाले तर देशातून मोठ्या प्रमाणात कांद्याची निर्यात होण्याची शक्यता आहे. खरेतर नुकत्याच काही दिवसांपूर्वी कांदा निर्याती संदर्भात मोठा निर्णय घेतला आहे.सरकारने बांगलादेश, यूएई, भूतान, मॉरिशस आणि बहरिन या देशांना एकूण ६८ हजार ६७० टन कांदा निर्यातीला परवानगी दिली आहे.
पण ही कांदा निर्यात एनसीईएलच्या माध्यमातून केली जाणार असल्याने याचा शेतकऱ्यांना फायदा होणार नाहीये. यामुळे कांदा निर्यात बंदीचा फास सैल झाला पाहिजे अशी आशा शेतकऱ्यांची आहे. दरम्यान 31 मार्च नंतर कांदा निर्यात बंदी उठवण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
परंतु कांदा निर्यात बंद उठवल्यानंतर खरंच कांद्याचे भाव वाढणार का ? हा प्रश्न कायम आहे. कारण की नाफेडच्या माध्यमातून कांद्याच्या किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी नेहमीच प्रयत्न केले जात असतात. मात्र बाजार अभ्यासकांनी निर्यातबंदीचा फास बाजारावरून सैल झाला तर नाफेडचा उपद्वाप वाढला तरी कांद्याचे भाव सुधारू शकतात, अशी आशा यावेळी व्यक्त केली आहे.
बाजारातील तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्रीय कृषी विभागाने यंदाचे कांदा उत्पादन जवळपास १६ टक्क्यांनी कमी राहील, असा अंदाज दिला आहे. तसेच देशातील एकूण कांदा उत्पादनाचा विचार केला तर रब्बी म्हणजेच उन्हाळ कांद्याचे प्रमाण यामध्ये सर्वाधिक असल्याचे दिसून येते.
रब्बी हंगामात देशातील एकूण कांदा उत्पादनात पैकी 70% उत्पादन होते. म्हणजेच जो कांदा यापुढच्या काळात बाजारात येईल त्याचेही उत्पादन कमी होणार आहे. तसेच खरिपातील कांदा जास्त दिवस साठवता येत नाही. पण रब्बीचा कांदा खूप दिवस साठवता येतो.
म्हणजेच शेतकरी लगेचच कांदा विक्रीचे नियोजन करणार नाहीत. ते भाव वाढीच्या आशेने माल मागे ठेऊ शकतात. हेच कारण आहे की, बाजाराला आधार मिळू शकतो. मात्र यासाठी कांदा निर्यात पुन्हा पूर्ववत सुरु होणे आवश्यक राहणार आहे.