Onion Rate Hike : लोकसभा निवडणुकीत कांद्याचा मुद्दा फारच चर्चेत होता. त्यावेळी महाराष्ट्रातील बाजारांमध्ये कांद्याला अपेक्षित भाव मिळत नव्हता. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. परिणामी शेतकऱ्यांमध्ये सरकार विरोधात नाराजी होती. त्यावेळी लागू असणाऱ्या निर्यात बंदीमुळे कांद्याचे दर पडलेले होते.
यामुळे, सत्ताधाऱ्यांना निवडणुकीत याचा फटका सहन करावा लागला आहे. लोकसभा निवडणुकीत सत्ताधाऱ्यांना हवे तसे यश मिळाले नाही. कांद्याच्या प्रश्नाने भारतीय जनता पक्षाचे अबकी बार 400 पार चा नारा हवेत उडवला.
खऱ्या अर्थाने सरकारला शेतकऱ्यांनी इंगा दाखवला होता. पण निवडणुकीनंतर कांद्याच्या बाजारभावात मोठी सुधारणा पाहायला मिळाली आहे. विशेष म्हणजे गेल्या काही दिवसांपासून कांद्याचे दर तेजीतच आहेत.
त्यामुळे शेतकऱ्यांना आता कुठे दिलासा मिळत आहे. अशातच, मात्र नाफेड बफर स्टॉक मधील कांदा खुल्या बाजारात विक्रीसाठी उतरवणार अशा चर्चा रंगू लागल्या आहेत.
यामुळे देशांतर्गत कांद्याची उपलब्धता वाढेल आणि बाजारभाव पडतील अशी भीती देखील व्यक्त केली जात आहे. मात्र नाफेडचा हा कांदा 10 सप्टेंबर नंतरच बाजारात येणार आहे. यामुळे तोपर्यंत कांद्याचे दर असेच तेजीत राहणार असे म्हटले जात आहे.
दरम्यान आज महाराष्ट्रातील दोन महत्त्वाच्या बाजारांमध्ये कांद्याला चांगला विक्रमी दर मिळाला आहे. या बाजारात कांद्याला या हंगामातील विक्रमी भाव मिळाला आहे.
कुठं मिळाला विक्रमी दर?
महाराष्ट्र राज्य कृषी पणन महामंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, आज विदर्भातील चंद्रपूर गंजवड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याला किमान 3500, कमाल 5500 आणि सरासरी 4,250 रुपये प्रति क्विंटल एवढा विक्रमी दर मिळाला आहे.
याशिवाय आज विदर्भातील अमरावती फळे आणि भाजीपाला मार्केटमध्ये देखील कांद्याला हंगामातील विक्रमी दर मिळाला आहे. या मार्केटमध्ये आजच्या लिलावात कांद्याला किमान 3000, कमाल 5500 आणि सरासरी 4250 रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाला आहे.
यामुळे राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर पुन्हा एकदा आनंदाचे भाव आहेत. शेतकऱ्यांना या विक्रमी दरामुळे दिलासा मिळत आहे. दुसरीकडे नाशिक जिल्ह्यातील बाजारांमध्ये उन्हाळी कांद्याला सरासरी 3 हजार रुपये ते 3550 रुपये प्रतिक्विंटल पर्यंतचा भाव मिळाला आहे.