Onion Rate : कांदा हे महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात उत्पादित होणार एक मुख्य नगदी पीक आहे. या पिकाची पश्चिम महाराष्ट्रात सर्वाधिक शेती पाहायला मिळत असली तरी राज्यातील जवळपास सर्वच विभागात याची शेती केली जाते.
राज्यातील शेतकऱ्यांचा सर्व मदार कांदा या नगदी पिकावर असल्याचे आपल्याला स्पष्ट दिसते. मात्र यावर्षी कांद्याने शेतकऱ्यांचा चांगलाच वांदा केला आहे. कांदा दर यावर्षी दबावात आहेत. एप्रिल महिन्यात उत्पादित झालेला रब्बी हंगामातील कांदा सुरवातीला कवडीमोल दरात विक्री होत होता.
म्हणून शेतकऱ्यांनी साठवणूक केली. भविष्यात चांगला दर मिळेल अशी शेतकऱ्यांना आशा होती. मात्र ऑक्टोबर महिन्यापर्यंत शेतकऱ्यांची ही आशा फोल ठरली. परिणामी कांदा चाळीत साठवलेला बहुतांशी कांदा खराब झाला. दरम्यान ऑक्टोबर महिन्यापासून कांदा दरात वाढ झाली.
नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात कांदा चांगल्या विक्रमी दरात विकला जात होता. मात्र आता गेल्या दहा ते 12 दिवसांपासून दरात मोठी घट झाली आहे. 15 नोव्हेंबर पर्यंत 3 हजार रुपये प्रति क्विंटल दराने विक्री होणारा कांदा आता मात्र 1500 रुपये प्रति क्विंटल दराने विक्री होत आहे. आज देखील कांद्याला सरासरी बाजार भाव 1500 रुपये प्रति क्विंटल च्या आसपासच पाहायला मिळत आहे.
अशा परिस्थितीत मात्र पिंपळगाव एपीएमसी मध्ये कांद्याला विक्रमी दर मिळत आहे. पिंपळगाव एपीएमसी मध्ये पोळ कांद्याला तब्बल 3400 प्रतिक्विंटलचा विक्रमी दर मिळत असल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव आहेत. आज पिंपळगाव एपीएमसी मध्ये झालेल्या लिलावात पोळ कांद्याची 1460 क्विंटल आवक झाली.
आज झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये कांद्याला पाचशे रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 3400 प्रतिक्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी बाजार भाव 2700 रुपये प्रति क्विंटल नमून झाला आहे.
निश्चितच नवीन पोळ कांदा या एपीएमसी मध्ये अधिक दरात विक्री होत आहे. मात्र उन्हाळी कांदा अतिशय कवडीमोल दरात विक्री होत आहे. यामुळे साहजिकच शेतकऱ्यांमध्ये नाराजी पाहायला मिळत आहे.