Onion Rate : गेल्या काही दिवसांपूर्वी केंद्र शासनाने किरकोळ बाजारातील कांद्याच्या किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी एक अतिशय महत्त्वाचा आणि मोठा निर्णय घेतला. केंद्र सरकारने कांदा निर्यात करण्यासाठी 40 टक्के शुल्क आकारण्याचे जाहीर केले. या निर्णयामुळे सरकारची मोठी किरकिरी देखील झाली.
शासनाविरोधात शेतकऱ्यांची नाराजी वाढली. सरकार मात्र सर्वसामान्य ग्राहकांना दिलासा देण्यासाठी हा निर्णय घेतला असल्याचे वारंवार सांगत आले आहे. परंतु सरकारने घेतलेला हा निर्णय किरकोळ बाजारातील कांद्याच्या किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी अक्षम ठरला असल्याचे चित्र आहे. कारण की गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या किमती पुन्हा एकदा वाढू लागल्या आहेत.
यामुळे सर्वसामान्य ग्राहकांना महागाईची झळ सहन करावी लागत आहे. तर कांदा उत्पादकांना यामुळे थोडासा दिलासा मिळाला आहे. जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, अफगाणिस्तान, तुर्कस्तान आणि पाकिस्तानातं कांद्याची उपलब्धता नसल्याने दुबई, श्रीलंका, मलेशिया, सिंगापूर, बांगलादेशमध्ये भारतातून मोठ्या प्रमाणात कांदा निर्यात होत आहे.
याचा परिणाम म्हणून उन्हाळी कांद्याच्या बाजारभावात मोठी वाढ झाली आहे. उन्हाळी कांद्याचे दर तीन हजार रुपयांच्या घरात पोहोचले आहेत. शिवाय येत्या काही दिवसात कांद्याच्या बाजारभावात वाढ होण्याची शक्यता देखील नाकारता येत नाहीये. त्यामुळे भविष्यात कांदा उत्पादकांना आणखी दिलासा मिळेल असे चित्र तयार होत आहेत.
काल लासलगाव एपीएमसी मध्ये उन्हाळी कांद्याला तीन हजार रुपये एवढा सरासरी भाव मिळाला आहे. तसेच पिंपळगाव बसवंत मध्ये 2850 रुपये प्रति क्विंटल एवढा भाव मिळाला आहे. देवळा, नामपुर आणि नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये देखील उन्हाळी कांद्याला काल 2800 रुपये प्रतिक्विंटल असा सरासरी बाजार भाव मिळाला आहे. तसेच राज्यातील इतरही बाजारात उन्हाळी कांद्याला दोन हजार रुपये ते 2600 रुपये प्रति क्विंटल पर्यंतचा भाव मिळाला आहे.
बाजारभाव आणखी वाढणार का?
खरंतर सध्या उन्हाळी हंगामातील कांदा शेतकऱ्यांकडे खूपच कमी प्रमाणात शिल्लक राहिला आहे. ज्यावेळी उन्हाळी कांदा संपतो त्यावेळी बाजारात नवीन हंगामातील लाल कांदा येत असतो. सध्या नवीन हंगामातील लाल कांदा बाजारात आला आहे. पण नवीन कांद्याची आवक खूपच कमी आहे.
तज्ञांच्या मते नवीन हंगामातील लाल कांदा आवक आणखी एका महिन्यानंतर वाढण्याची शक्यता आहे. यामुळे पुढील एक महिना तरी बाजारात तेजी कायम राहील असे मत व्यक्त होत आहे. सध्या नवीन कांदा 2000 ते 3400 रुपये प्रति क्विंटल एवढ्या सरासरी दरात विकला जात आहे.