Onion Rate : गेल्या चार ते पाच दिवसांपासून महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांना दिलासा मिळत आहे. खरं पाहता यावर्षी शेतकरी बांधवांना आपला कांदा अतिशय कमी दरात विक्री करावा लागला आहे. ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यातील पहिला पंधरवाडा सोडला असता कांद्याला अतिशय नगण्य दर मिळाला आहे.
ऑक्टोबर पूर्वी कांद्याला 1000 रुपये प्रति क्विंटलच्या आसपास दर मिळत होता. ऑक्टोबर महिन्यात यामध्ये वाढ झाली अन कांदा 2500 रुपये प्रति क्विंटल एवढ्या सरासरी दरात विकला गेला. नोव्हेंबरच्या पहिल्या पंधरवड्यात कांद्याला तब्बल तीन हजार रुपये प्रति क्विंटल एवढा सरासरी दर आणि अनेक बाजारात कमाल दर 3500 रुपये मिळाला.
मात्र नंतर कांद्याला 1 हजार रुपये प्रति क्विंटल पेक्षा कमी दर मिळू लागला. यामुळे उत्पादक शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली. आता चार ते पाच दिवसांपासून दरात वाढ झाली आहे. सरासरी बाजार भाव 1500 रुपये प्रति क्विंटल पेक्षा अधिक नमूद केला जात आहे.
दरम्यान पुणे जिल्ह्यातील मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीचे मुख्य आवारात कांद्याला 2250 रुपये प्रतिकूल ठरते 2300 प्रतिक्विंटल पर्यंतचा कमाल दर मिळाला आहे. गुरुवारी झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये 4500 क्विंटल कांदा आवक झाली.
गुरुवारी झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये जुना कांदा 1800 रुपये प्रति क्विंटल ते 2250 रुपये प्रति क्विंटल यादरम्यान विकला गेला. विशेष म्हणजे मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आता नवीन कांदा आवक होत आहे. या लिलावात संगमनेर येथील संदीप मुरलीधर गुंड यांच्या जुन्या कांद्याला 2250 चा दर मिळाला.
तसेच खेड तालुक्यातील निमगाव दावडी येथील शिवाजी रामचंद्र म्हसाडे यांच्या नवीन गोळा कांद्याला 2300 प्रतिक्विंटलचा दर मिळाला. यावेळी व्यापाऱ्यांनी नवीन कांद्याला चांगला दर मिळेल अशी आशा व्यक्त केली. निश्चितच कांदा दरात झालेली वाढ शेतकऱ्यांसाठी दिलासादायक सिद्ध होत आहे.
मात्र असे असले तरी सध्या मिळत असलेला दर हा कांदा उत्पादकांच्या अपेक्षेप्रमाणे नसून कांदा उत्पादकांना किमान 3000 रुपये प्रतिक्विंटल एवढा दर मिळावा अशी इच्छा आहे. एकंदरीत कांद्याची तीन हजाराकडे वाटचाल सुरू झाली असून भविष्यात दर वाढ झाली तर कांदा उत्पादकांना अजूनच दिलासा मिळेल यात तीळमात्र देखील शंका नाही.