Onion Rate : नुकत्याच काही दिवसांपूर्वी केंद्रातील सरकारने कांदा निर्यात सुरू केली आहे. कांदा निर्यात बंदी उठवण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याने बाजारभावात सुधारणा होणार असे बोलले जात होते. खरे तर निर्यात सुरू झाली आणि त्यानंतर बाजारभावात सुधारणा देखील पाहायला मिळाली. चार मे 2024 ला कांदा निर्यात बंदी मागे घेण्याची अधिसूचना जारी झाली.
ज्या दिवशी अधिसूचना जारी झाली त्याच दिवशी उन्हाळ कांदा बाजारभावात पाचशे रुपयांपर्यंतची वाढ झाली. यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठे समाधानाचे वातावरण पाहायला मिळाले. मात्र बाजारभावात झालेली ही सुधारणा जास्त काळ टिकू शकली नाही.
आता पुन्हा एकदा बाजारभावात मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे. बाजार भाव पुन्हा एकदा पाचशे रुपयांपर्यंत गडगडले आहेत. यामुळे राज्यातील कांदा उत्पादक पुन्हा संकटात सापडले असून शेतकऱ्यांमध्ये नाराजी पाहायला मिळत आहे.
यामुळे निवडणुकीच्या धामधुमीत शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी निर्यात बंदी मागे घेण्याचा घेतलेला निर्णय प्रत्यक्षात शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरत नसल्याचे चित्र आहे. तीन मे 2024 पर्यंत म्हणजे निर्यात बंदी लागू असताना कांद्याला बाराशे रुपये प्रति क्विंटल ते 1500 रुपये प्रति क्विंटल असा भाव मिळत होता.
पण, निर्यात सुरू झाल्यानंतर हा बाजार भाव 2000 रुपये प्रति क्विंटल पर्यंत पोहोचला. परंतु सोमवारी कांद्याचे बाजार भाव पुन्हा एकदा 500 रुपयांपर्यंत घसरलेत. कृषी क्षेत्रातील जाणकार लोकांनी सांगितल्याप्रमाणे, निर्यातबंदी मागे घेण्यात आली आहे.
पण कांदा निर्यातीसाठी काही अटी आणि शर्ती लावून देण्यात आल्या आहेत. प्रतिटन ५५० डॉलर किमान निर्यात मूल्य व सोबतच ४० टक्के निर्यात शुल्क लागू राहणार असे केंद्रातील सरकारने स्पष्ट केले आहे.
त्यामुळे निर्यात सुरू झाली असली तरी देखील अप्रत्यक्षरीत्या निर्यात बंदीचा प्रयत्न केला गेला असल्याचे समजतं आहे. कारण की, किमान निर्यातमूल्य आणि निर्यातशुल्क मिळून कांदा निर्यात किंमत प्रतिकिलो ६३ ते ६४ रुपयांपर्यंत जात आहे. निर्यातदारांना निर्यात शुल्क द्यावे लागते.
परिणामी, केंद्रातील सरकारने निर्यातीस परवानगी दिली असली तरी सुद्धा निर्यातमूल्य व निर्यात शुल्क लादून एका प्रकारे निर्यात होऊ द्यायची नाही याची काळजी देखील सरकारने घेतली आहे. त्यामुळे निर्यातबंदी मागे घेण्याचा हा निर्णय म्हणजेच निव्वळ धुळफेक असल्याची तक्रार शेतकऱ्यांच्या माध्यमातून केली जात आहे.