Onion Price : राज्यासह देशातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. खरे तर नोव्हेंबर 2023 मध्ये कांद्याला विक्रमी भाव मिळत होता. घाऊक बाजारात कांदा चार ते साडेचार हजार रुपये प्रतिक्विंटल पर्यंत विकला जात होता. काही बाजारांमध्ये याहीपेक्षा अधिक दर नमूद करण्यात आला.
तसेच दुसरीकडे किरकोळ बाजारांमध्ये कांद्याच्या किमती 80 रुपये प्रति किलोपर्यंत पोहोचल्या होत्या. काही ठिकाणी यापेक्षा अधिक भाव होता. यामुळे सर्वसामान्यांमध्ये शासनाविरोधात नाराजी वाढत चालली होती. हेच कारण आहे की आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर किरकोळ बाजारातील कांदा किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी सरकारने मोठा निर्णय घेतला.
सरकारने कांदा निर्यात बंदी केली. या सोबतच सरकारने सर्वसामान्य नागरिकांसाठी सवलतीच्या दरात कांदा उपलब्ध करुन दिला आहे. केंद्र शासनाच्या माध्यमातून 25 रुपये प्रति किलो या भावात बाजारात कांदा उपलब्ध करून देण्यात आला. याचा परिणाम म्हणून देशांतर्गत कांद्याची उपलब्धता वाढली.
हेच कारण आहे की, कांद्याचे भाव मोठ्या प्रमाणात घसरलेत. हाती आलेल्या माहितीनुसार गेल्या एका महिन्यात घाऊक बाजारात कांद्याच्या किमती 35 टक्क्यांनी कमी झाल्या आहेत. विशेष म्हणजे दरवाढ रोखण्यासाठी घेतलेल्या निर्णयामुळे किरकोळ बाजारात देखील या किमती 30 टक्क्यांनी कमी झाल्या आहेत.
यामुळे सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळत असला तरी देखील कांदा उत्पादकांचे मात्र मोठे नुकसान होत आहे. उत्पादक शेतकऱ्यांना केंद्रातील मोदी सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे आर्थिक भ्रूदंड सहन करावा लागत आहे. कांद्याला बाजारात शेतकऱ्यांच्या अपेक्षेप्रमाणे भाव मिळत नाहीये.
शिवाय आता बाजारात खरीप हंगामातील लाल कांदा देखील मोठ्या प्रमाणात येऊ लागला आहे. लाल कांद्याची आवक वाढली असल्याने राज्यातील अनेक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाव गडगडले आहेत. सध्या राज्यातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याला 1800 रुपये प्रति क्विंटल ते 2300 रुपये प्रति क्विंटल असा सरासरी भाव मिळत आहे.
दरम्यान, उत्पादनात आलेली घट आणि कांदा पीक उत्पादनासाठी केलेला खर्च पाहता सध्याचा भाव शेतकऱ्यांना परवडत नसल्याचे बोलले जात आहे. आता मात्र कांद्याच्या बाजारभावात पुन्हा एकदा वाढ होऊ शकते असे चित्र तयार होत आहे.
कारण की केंद्रातील मोदी सरकारच्या माध्यमातून आता कांदा निर्यात पुन्हा एकदा सुरु केली जाऊ शकते, असा मोठा दावा करण्यात आला आहे. मीडिया रिपोर्टनुसार मोदी सरकार लवकरच कांद्याची निर्यात सुरू करण्यासाठी हिरवा झेंडा दाखवणार आहे.
सरकार निवडक पावले उचलून कांद्याची निर्यात खुली करू शकते. वास्तविक, खरीप कांद्याचा साठा जास्त काळ ठेवता येत नाही. त्याचे नुकसान होण्याची शक्यता असते. यामुळे आता शेतकरी बांधव लाल कांद्याची साठवणूक करणार नाहीत, बाजारात लाल कांद्याची आवक सुरूच राहणार आहे.
परिणामी देशांतर्गत कांद्याची उपलब्धता कायम राहणार आणि आता दरात मोठी वाढ होणार नाही असा अंदाज आहे. यामुळे आता कांद्याची निर्यात खुली होऊ शकते असा दावा केला जात आहे. याबाबत अद्याप केंद्र शासनाच्या माध्यमातून कोणतीच माहिती समोर आलेली नाही परंतु लवकरच याबाबतचा अधिकृत निर्णय निर्गमित होईल अशी आशा आहे.