Onion Price Maharashtra : कांदा या पिकाला नगदी पिकाचा दर्जा प्राप्त आहे. सोयाबीन, कापूस या पिकांप्रमाणे कांद्याची देखील महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात लागवड होते. या पिकाची राज्यात खरीप, लेट खरीप आणि रब्बी म्हणजे उन्हाळी अशा तीनही हंगामात मोठ्या प्रमाणात लागवड होते. मात्र रब्बी हंगामातील उत्पादन सर्वाधिक आहे.
राज्यातील जवळपास सर्वच जिल्ह्यात कमी अधिक प्रमाणात कांद्याची लागवड होते. पण अहमदनगर, नासिक समवेतच उत्तर महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यात या पिकाची मोठ्या प्रमाणात शेती होते. या शिवाय पश्चिम महाराष्ट्रातही या पिकाची लागवड विशेष उल्लेखनीय आहे. या पिकाला कॅश क्रॉप म्हणून ओळखले जाते मात्र बाजारभावात असणारा लहरीपणा अनेकदा उत्पादकांच्या मुळावर उठतो.
बाजारातील लहरीपणामुळे कित्येकदा तर शेतकऱ्यांना पिकासाठी आलेला उत्पादन खर्च देखील भरून काढता येत नाही. या चालू वर्षातील फेब्रुवारी ते जून या काळातही अशीच परिस्थिती पाहायला मिळाली होती. राज्यातील बाजारात कांदा जवळपास पाच ते सहा महिने अगदी कवडीमोल दरात विकला गेला होता.
पण गेल्या महिन्याभरापासून कांद्याच्या दरात सातत्याने सुधारणा पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे गेल्या दहा ते बारा दिवसांपासून कांदा बाजार खूपच तेजीत आला आहे. आज देखील राज्यातील प्रमुख बाजारात कांद्याला चांगला विक्रमी भाव मिळाला आहे.
आज राज्यातील सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याला तब्बल 3500 रुपये प्रतिक्विंटलचा भाव मिळाला आहे. या मार्केटमध्ये आज 12435 क्विंटल कांदा आवक झाली होती. आजच्या लिलावात या मार्केटमध्ये कांद्याला शंभर रुपये प्रति क्विंटल किमान, 3500 रुपये प्रति क्विंटल कमाल आणि 1,400 रुपये प्रति क्विंटल एवढा सरासरी भाव नमूद करण्यात आला आहे.
या बाजारातही मिळाला विक्रमी दर
पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समिती : या बाजारात कांद्याला 3200 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल आणि 1800 रुपये प्रति क्विंटल एवढा सरासरी दर मिळाला आहे.
संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समिती : या मार्केटमध्ये आज 6 हजार 334 क्विंटल उन्हाळी कांदा आवक झाली. आजच्या लिलावात या मार्केटमध्ये कांद्याला किमान 300, कमाल 2965 आणि सरासरी 1632 रुपये प्रति क्विंटल एवढा भाव मिळाला आहे.
कळवण कृषी उत्पन्न बाजार समिती : या मार्केटमध्ये आज कांद्याला 2900 प्रतिक्विंटल एवढा कमाल आणि 2350 रुपये प्रति क्विंटल एवढा सरासरी भाव मिळाला आहे.
पिंपळगाव बसवंत कृषी उत्पन्न बाजार समिती : या मार्केटमध्ये उन्हाळी कांद्याला 2955 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल भाव मिळाला असून सरासरी दर 2350 रुपये प्रति क्विंटल एवढा मिळाला आहे.