Onion Price : सध्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळत आहे. कारण की, गेल्या दोन दिवसांपासून कांद्याला चांगला दर मिळत आहे. म्हणून उत्पादक शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. खरंतर गेल्या दोन वर्षांपासून कांद्याची शेती हा आतबट्ट्याचा सौदा ठरला आहे.
दोन वर्षांपासून कांद्याला अपेक्षित असा भाव मिळत नसल्याने उत्पादक शेतकऱ्यांना पिकासाठी आलेला उत्पादन खर्च देखील भरून काढता आलेला नाही. गेल्या खरीप हंगामामध्ये उत्पादित केलेला कांदा देखील शेतकऱ्यांना कवडीमोल दरातच विकावा लागला.
तसेच उन्हाळी हंगामातील कांदा बाजारात आल्यानंतरही कांद्याला अपेक्षित असा भाव मिळत नव्हता. अशातच मात्र बांगलादेशने मार्च महिन्यापासून लावलेले कांदा आयातीवरील निर्बंध हटवले आहेत. यामुळे बांगलादेशमध्ये आता मोठ्या प्रमाणात कांदा निर्यात होण्यासाठी अनुकूल परिस्थिती तयार झाली आहे.
बांगलादेशमधील कांदा निर्यात वाढत असल्याने आता उन्हाळी हंगामातील कांदा कडाडला आहे. उन्हाळी हंगामातील कांदा दरात वाढ होत असून यामुळे कांदा उत्पादकांना निश्चितच दिलासा मिळण्यास सुरुवात झाली आहे.
सध्या बाजारात 1500 रुपये प्रति क्विंटल पर्यंतच्या कमाल दरात उन्हाळी कांदा विक्री होत आहे. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळत असला तरी देखील अपेक्षित असा बाजार भाव अजूनही मिळत नसल्याचे शेतकऱ्यांनी नमूद केले आहे.
राज्यातील पिंपळगाव समवेतच नाशिक जिल्ह्यातील सर्वच प्रमुख बाजारात आणि कोल्हापूर, केडगाव, सातारा, राहता, जुन्नर, हिंगणा, पेण, खरार अशा महत्वाच्या बाजार समित्यांमध्ये 9 ते 17 रुपये प्रति किलो पर्यंतचा बाजार भाव कांद्याला मिळत आहे.
वास्तविक, यावर्षी उन्हाळी हंगामातील कांदा पिकाला मार्च एप्रिल आणि मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसाचा देखील फटका बसला आहे.
यामुळे पीक उत्पादनात देखील घट आली आहे शिवाय उन्हाळी हंगामातील कांद्याची टिकवण क्षमता देखील कमी झाली आहे. यामुळे सध्या बाजारात कांद्याची आवक वाढलेली आहे. मात्र आगामी काही दिवसात कांद्याची आवक कमी होणार आहे.
हे पण वाचा :- Cotton Price : कापूस पंढरीत पांढरं सोन चमकलं ! कापसाला मिळाला ‘इतका’ विक्रमी दर, आणखी भाव वाढणार? पहा….
शिवाय बांगलादेशमध्ये देखील आता मोठ्या प्रमाणात कांदा निर्यात होण्याची शक्यता आहे. यामुळे येत्या काही दिवसात मंडईमध्ये भाव वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जुलै महिन्यात उन्हाळी कांदा दरात तेजी येऊ शकते असा अंदाज काही तज्ञांनी व्यक्त केला आहे.
तसेच ऑक्टोबर ते डिसेंबर या काळात कांदा टंचाई जाणवण्याची शक्यता आहे. परिणामी आगामी काही दिवसात दरात सुधारणा होईल असा अंदाज आहे. यामुळे निश्चितच शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असे चित्र तयार होत आहे.
या बाजारात मिळाला सर्वोच्च भाव
दरम्यान, काल झालेल्या लिलावात कल्याण एपीएमसी मध्ये कांद्याला 1400 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला असून 1300 रुपये प्रति क्विंटल एवढा सरासरी दर नमूद करण्यात आला आहे.
तसेच पिंपळगाव एपीएमसी मध्ये काल 1700 रुपये प्रतिक्विंटल एवढा कमाल दर मिळाला असून सरासरी बाजार भाव 1 हजार 50 रुपये प्रतिक्विंटल नमूद करण्यात आला आहे. राज्यातील इतर बाजारात मात्र 900 रुपये प्रति क्विंटल ते अकराशे रुपये प्रति क्विंटल पर्यंतचा सरासरी बाजार भाव नमूद करण्यात आला आहे.
हे पण वाचा :- म्हशीच्या अधिक दूध उत्पादन देणाऱ्या टॉप चार जाती आणि त्यांच्या विशेषता, वाचा….