Onion News : गेल्या दहा दिवसांपासून कांद्याला चांगला भाव मिळत आहे. खरंतर गेल्या महिन्याभरापासून रोजाना कांदा बाजार भावात वाढ होत आहे. मात्र गत आठ ते दहा दिवसांपासून बाजारात चांगलीच तेजी आली आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळत आहे. फेब्रुवारी ते जून पर्यंत अगदी कमी दरात कांदा विक्री केल्यानंतर शेतकऱ्यांना आता कुठे दिलासा मिळत आहे.
खरंतर, रब्बी हंगामातील कांदा अवकाळी पावसामुळे, गारपिटीमुळे मोठ्या प्रमाणात खराब झाला आहे. तसेच हवामानात झालेल्या बदलामुळे कांदा चाळीत साठवलेला कांदा खराब झाला असल्याने सध्या कांद्याची आवक कमी झाली आहे. शेतकऱ्यांचा जवळपास 60 टक्के कांदा खराब झाला असून याचा परिणाम म्हणून रब्बी हंगामातील कांदा दोन महिने पूर्वीच संपणार असा अंदाज आहे.
साहजिक कांद्याची मागणी आणि पुरवठा यामध्ये तफावत होत असल्याने गत आठ ते दहा दिवसांपासून बाजारभावात चांगलीच सुधारणा झाली आहे. राज्यातील अनेक बाजारात कांद्याला 1,500 रुपये प्रतिक्विंटल ते दोन हजार रुपये प्रति क्विंटल पर्यंतचा सरासरी दर मिळत आहे. तर कमाल बाजारभावाने पंचवीसशे रुपयाचा टप्पा गाठला आहे. काही बाजारात तर 3,000 रुपये प्रति क्विंटल पर्यंतचा कमाल दर मिळत आहे.
यामुळे साहजिकच उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळत आहे. गेली कित्येक महिने कवडीमोल दरात कांदा विकल्यानंतर आता कुठे शेतकऱ्यांना दिलासा मिळत आहे. विशेष म्हणजे पुढल्या महिन्यात किरकोळ बाजारात कांदा 55 ते 60 रुपये प्रति किलो पर्यंत पोहोचू शकतो असा अंदाज क्रीसील रिपोर्टमध्ये नुकताच वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचे स्वयंपाक घरातील बजेट बिघडणार अशी शक्यता आहे.
दरम्यान, कांदा दरावर नियंत्रण मिळवण्यासाठी केंद्र शासनाच्या माध्यमातून आतापासूनच प्रयत्न सुरू झाले आहेत. केंद्रशासन नाफेडने खरेदी केलेला बफरच स्टॉक मधील कांदा आता खुल्या बाजारात पाठवणार अशी बातमी समोर येत आहे. सोशल मीडियामध्ये ही बातमी वेगाने व्हायरल होत असून यामुळे शेतकऱ्यांमध्ये शासना विरोधात संतापाची लाट उसळली आहे.
अशातच मात्र नाफेडच्या माध्यमातून याबाबत एक पत्रक काढण्यात आले आहे. या पत्रकात नाफेडने 15 सप्टेंबर नंतर बफर स्टॉक मधील कांदा बाजारात विकण्याबाबत निर्णय घेतला जाईल असे स्पष्ट केले आहे. एकंदरीत, शासन 15 सप्टेंबर नंतर याबाबत निर्णय घेणार असल्याने देशभरातील कांदा उत्पादकांना तूर्तास दिलासा मिळेल असा आशावाद आता व्यक्त होऊ लागला आहे.