Onion News : कांदा उत्पादकांसाठी एक अतिशय महत्त्वाचे आणि थोडीशी दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. ती म्हणजे कांद्याचे बाजार भाव भविष्यात सुधारण्याची शक्यता तज्ञांनी वर्तवली आहे. यामुळे कांदा उत्पादकांना निश्चितच दिलासा मिळणार आहे.
महाराष्ट्र हे कांदा उत्पादनाच्या बाबतीत देशात पहिल्या क्रमांकावर विराजमान आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून राज्यातील कांदा आवक कमी होत आहे. विशेष म्हणजे आगामी काळात आवक कमीच राहणार अशी शक्यता आहे.
गेल्या दोन आठवड्यात देशपातळीवरील कांद्याची आवक 20 टक्क्यांनी कमी झाल्याचे निरीक्षण नोंदवले गेले आहे. शिवाय केंद्र शासनाने काही प्रमाणात कांदा निर्यातीला मंजुरी सुद्धा दिली आहे. हेच कारण आहे की, कांद्याच्या बाजारभावात गेल्या काही दिवसात क्विंटल मागे शंभर ते दीडशे रुपयांची वाढ झाली आहे.
दरम्यान, नाशिक जिल्ह्यात सध्या उन्हाळी कांद्याला सोळाशे रुपये प्रतिक्विंटल असा सरासरी भाव मिळत असून लाल कांद्याला 1650 रुपये प्रति क्विंटल असा सरासरी भाव नमूद करण्यात आला आहे.दरम्यान काही तज्ञांनी आगामी काळात कांद्याचे भाव आणखी वाढतील अशी शक्यता यावेळी बोलून दाखवली आहे.
आम्ही आपणास सांगू इच्छितो की, गेल्या काही दिवसांपासून नाशिकमधील बाजारसमित्यांमध्ये कांद्याचे दर वाढत आहेत. तसेच जिल्ह्यात येणाऱ्या काळात कांद्याचे बाजार भाव आणखी वाढण्याची शक्यता आहे. कांदाच्या संभाव्य बाजारभावाबाबत काही कांदा व्यापारी आणि निर्यातदारांनी सांगितले की, कांद्याची देशातील अंतर्गत गरज वाढत आहे.
गरज वाढत असल्याने कांद्याची मागणी वाढणी असून या पार्श्वभूमीवर सध्या बाजार भाव देखील वाढले आहेत. दुसरीकडे हंगामातला लाल कांदा आवक कमी होत असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली आहे. हेच कारण आहे की, कांदा बाजारभाव गेल्या तीन आठड्यात १०० ते १५० रुपयांनी वाढले आहेत.
विशेष म्हणजे काही प्रमाणात कांदा निर्यात सुरू झाली आहे. याचा देखील बाजार भावाला आधार मिळत आहे. पण, व्यापाऱ्यांच्या मते जर शासनाने निर्यातबंदी उठवली नसती, तरीही कांदा बाजारभाव हे आता जसे वाढले आहेत तसे वाढलेच असते.
परंतु ही जरी वस्तुस्थिती असली तरी देखील जर केंद्र शासनाने शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन पूर्णपणे निर्यातबंदी हटवली, तर कांदा बाजारभावात विक्रमी वाढ पाहायला मिळाली असती. पूर्णपणे कांदा निर्यात सुरू झाली असती तर कांद्याला अडीच ते तीन हजार रुपये प्रति क्विंटल असा विक्रमी भाव मिळाला असता असा आशावाद व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
मात्र असे असले तरी भविष्यात कांद्याला दोन ते अडीच हजाराचा भाव मिळू शकतो. भाव वाढीसाठी पोषक परिस्थिती सुद्धा तयार झाली आहे. मात्र मार्च महिन्यात कांद्याची आवक कशी राहणार यावरच बाजारभावाचे पुढील चित्र स्पष्ट होऊ शकणार आहे.