Onion News Maharashtra : महाराष्ट्रात सध्या शेतकऱ्यांच्या बांधापासून ते मंत्रालयाच्या एसी ऑफिस पर्यंत सर्वत्र कांद्याच्या मुद्द्यावरून गदारोळ पाहायला मिळत आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा कांद्याचा मुद्दा गाजू लागला आहे. कांद्याच्या मुद्द्यावर राज्यातील शेतकरी आक्रमक झाले आहेत.
खरंतर शेतकऱ्यांनी फेब्रुवारी ते जून या कालावधीत कांदा अतिशय कवडीमोल दरात विकला. जुलै महिन्यात कांद्याच्या दरात थोडीफार वाढ झाली. ऑगस्टमध्ये मात्र कांदा बाजारात चांगली तेजी आली. ऑगस्ट महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात कांद्याचे सरासरी बाजार भाव दोन हजार रुपये प्रति क्विंटल ते 2500 रुपये प्रति क्विंटल पर्यंत पोहोचलेत.
काही ठिकाणी कांद्याला कमाल तीन हजार रुपये प्रति क्विंटलचा भाव मिळाला. यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळत होता. शिवाय पुढल्या महिन्यात कांद्याचे बाजार भाव आणखी कडाडणार असा अंदाज होता. यामुळे कांदा दर नियंत्रणात ठेवण्यासाठी आणि सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र शासनाने काही महत्त्वाचे निर्णय घेतलेत.
केंद्र शासनाने नेपाळमधून कांदा आयातीस मान्यता दिली आणि बफर स्टॉक मधील कांदा खुल्या बाजारात विक्रीस परवानगी दिली. तसेच केंद्र शासनाने कांदा निर्यात करण्यासाठी 40% शुल्क आकारण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. हे सर्व निर्णय मात्र राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी अडचणीचे ठरू शकतात असे सांगितले जात आहे.
या निर्णयामुळे कांदा बाजार भावात घसरण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना मोठे नुकसान सहन करावे लागू शकते. अशा परिस्थितीत सध्या राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी शासनाविरोधात आक्रमक झाले आहेत.
निर्यातीसाठी 40% शुल्क आकारण्याच्या निर्णयाविरोधात नासिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आणि व्यापाऱ्यांनी जिल्ह्यातील बाजार समिती, बेमुदत बंद करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. शेतकरी बांधव केंद्र शासन शेतमालाच्या किमती पाडण्यासाठी जाणून-बुजून हे निर्णय घेत असल्याचा आरोप करत आहेत.
एकीकडे शेतकरी कांद्याच्या या मुद्द्यावर आक्रमक बनत आहेत तर दुसरीकडे राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी या मुद्द्यावर दिल्ली गाठली आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात आज धनंजय मुंडे केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर आणि केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांच्या समवेत चर्चा करणार आहेत.
मुंडे यांची पियुष गोयल यांच्या समवेत चर्चा झाली असून याबाबत गोयल थोड्या वेळात माहिती देणार आहेत. अशातच जपान दौऱ्यावर असलेले राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची माहिती दिली आहे.
उपमुख्यमंत्री महोदय यांनी आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ट्विट करत माहिती दिली की, त्यांनी राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांच्या समवेत फोनवर चर्चा केली आहे. आता कांदा उत्पादकांना दिलासा देण्यासाठी केंद्र शासन 2 लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करणार आहे.
राज्यातील अहमदनगर आणि नाशिक या दोन जिल्ह्यात कांदा खरेदी केली जाणार आहे. यासाठी विशेष केंद्र सुरू केले जाणार असून या केंद्रात शेतकऱ्यांकडून 2410 रुपये प्रति क्विंटल या दरात कांद्याची खरेदी केली जाणार असल्याची माहिती फडणवीस यांनी यावेळी दिली आहे. यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असा आशावाद देखील देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला आहे.
दरम्यान याबाबत कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी नाफेडने तीन लाख मेट्रिक टन कांदा 11 ते 15 रुपये प्रति किलो दराने खरेदी केला असून यापुढील कांदा आता विक्रमी दरात खरेदी होणार अशी माहिती दिली आहे. एवढेच नाही तर कृषिमंत्री महोदय यांनी दोन लाख मॅट्रिक टन पेक्षा अधिक कांदा शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणला तरीदेखील तो कांदा विक्रमी दरात खरेदी करा अशी मागणी देखील केली आहे.