Onion Market Price In Maharashtra : गेली कित्येक महिने कवडीमोल दरात कांदा विक्री केल्यानंतर आता कुठे शेतकऱ्यांना दिलासा मिळू लागला आहे. सध्या बाजारात कांद्याच्या दरात चांगलीच तेजी पाहायला मिळत आहे. विशेष बाब अशी की, जाणकार लोकांच्या माध्यमातून या चालू महिन्याच्या अखेरपर्यंत कांद्याच्या भावात आणखी वाढ होणार असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
तसेच पुढल्या महिन्यात म्हणजेच सप्टेंबर महिन्यात कांद्याचे भाव किरकोळ बाजारात 70 रुपये प्रति किलोपर्यंत वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. निश्चितच कांद्याच्या भावात जर एवढी विक्रमी वाढ झाली तर राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना याचा फायदा मिळणार आहे. खरंतर, राज्यातील अहमदनगर, पुणे, नासिक समवेतच पश्चिम महाराष्ट्रातील बहुतांशी जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे कांदा या नगदी पिकावरच अर्थकारण अवलंबून आहे.
अशा परिस्थितीत कांद्याला चांगला भाव मिळाला तर शेतकऱ्यांचे अर्थकारण पुन्हा एकदा रुळावर येण्यास मदत मिळणार आहे. दरम्यान आज राज्यातील काही प्रमुख बाजारात उन्हाळी कांद्याच्या दरात सुधारणा पाहायला मिळाली आहे. उन्हाळी कांद्याला आता बाजारात विक्रमी दर मिळू लागला आहे. यामुळे आगामी काही दिवसात भावात आणखी वाढ होणार असा विश्वास शेतकऱ्यांना देखील वाटत आहे.
कोणत्या बाजारात मिळाला विक्रमी भाव?
महाराष्ट्र राज्य कृषी पणन महामंडळाचा अधिकृत संकेतस्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, आज अर्थातच 9 ऑगस्ट 2023 रोजी झालेल्या लिलावात राज्यातील वैजापूर-शिऊर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला सर्वोच्च भाव मिळाला आहे. या मार्केटमध्ये आज उन्हाळी कांद्याची 1,837 क्विंटल आवक झाली होती.
यात कांद्याला किमान दोनशे रुपये प्रति क्विंटल, कमाल 2700 रुपये प्रति क्विंटल आणि सरासरी 1,600 रुपये प्रति क्विंटल एवढा दर नमूद करण्यात आला आहे. याव्यतिरिक्त राज्यातील पिंपळगाव बसवंत कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज उन्हाळी कांद्याला 2400 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल भाव मिळाला आहे, तसेच 1801 रुपये प्रति क्विंटल एवढा सरासरी दर या बाजारात नमूद करण्यात आला आहे.