Onion Market Price : भारतात पुढील महिन्यात दिवाळीचा मोठा सण साजरा होणार आहे. दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर आत्तापासूनच बाजारपेठांमध्ये तेजी पाहायला मिळत आहे. बाजारपेठा दिवाळी सणाच्या अनुषंगाने पूर्णपणे सजल्या आहेत. दरम्यान, कांदा उत्पादक शेतकऱ्यांची दिवाळीच्यापूर्वीच दिवाळी झाली आहे.
कारण की, कांद्याच्या बाजारभावाला लाली आली आहे. कांदा पुन्हा एकदा कडाडला असून अहमदनगर मध्ये कांद्याला तब्बल पाच हजार रुपये प्रति क्विंटलचा भाव मिळाला आहे. यामुळे सध्या शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण पाहायला मिळत आहे. खरंतर, गेल्या काही दिवसांपासून कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये शासनाविरोधात नाराजी पाहायला मिळत आहे.
विशेषतः जेव्हापासून केंद्र सरकारने कांदा निर्यात करण्यासाठी 40% शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला आहे तेव्हापासून शेतकऱ्यांमध्ये मोठी नाराजी आहे. सरकार जाणून-बुजून शेतकरी विरोधी निर्णय घेत असल्याचा आरोप केला जात आहे. अशातच मात्र शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी समोर येत आहे.
काल अर्थातच 18 ऑक्टोबर 2023 रोजी अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याला तब्बल पाच हजार रुपये प्रति क्विंटल एवढा विक्रमी भाव मिळाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, काल श्रीरामपूर एपीएमसीमध्ये 6,820 गोणी कांद्याची आवक झाली होती. दरम्यान कालच्या लिलावात चांगल्या प्रतीच्या मालाला 5 हजार रुपये क्विंटल एवढा दर मिळाला आहे.
तसेच दुय्यम प्रतीचा कांदा ३५००, हलक्या दर्जाचा कांदा २०००, गोल्टी कांदा ३६०० रुपये प्रतिक्विंटल या बाजारभावात विकला गेला आहे. याशिवाय काल श्रीरामपूर एपीएमसी मध्ये लूज कांद्याची देखील आवक झाली होते. येथे काल 118 वाहनांमधून लूज कांद्याची आवक झाली.
काल या एपीएमसी मध्ये चांगल्या प्रतीच्या लूज कांद्याला ४०००, दुय्यम प्रतीचा कांदा ३५००, हलका प्रतवारीचा कांदा ३००० रुपये प्रतिक्विंटल या बाजारभावात विकला गेला आहे. विशेष म्हणजे शेतकऱ्यांकडील साठवलेला उन्हाळी हंगामातील कांदा आता संपत आला आहे. शिवाय नवीन हंगामातील लाल कांदा देखील बाजारात खूपच कमी प्रमाणात येत आहे.
पावसाच्या लहरीपणामुळे लाल कांद्याचे उत्पादन कमी झाले आहे. तसेच लाल कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक होण्यासाठी आणखी एका महिन्याची वाट पाहावी लागणार आहे. याशिवाय पुढील महिन्यात दिवाळी असल्याने कांद्याची मागणी दिवसेंदिवस वाढणारच आहे.
यामुळे मागणीनुसार कांद्याचा पुरवठा होत नसल्याचे चित्र आहे. अशा परिस्थितीत कांद्याचे बाजारभाव तेजीत आले आहेत आगामी काही दिवस असेच तेजीत राहतील असा आशावाद तज्ञ लोकांच्या माध्यमातून यावेळी वर्तवण्यात आला आहे.