Onion Market News : फेब्रुवारी ते जून पर्यंत कांदा कवडीमोल दरात विकल्यानंतर जुलै महिन्यात कांद्याच्या भावात सुधारणा झाली आहे. तेव्हापासून आत्तापर्यंत कांद्याचे दर तेजीतच आहेत. खरतर याला तेजी म्हणता येणार नाही मात्र हा भाव शेतकऱ्यांसाठी समाधानकारक आहे. या भावात निदान शेतकऱ्यांना वाहतुकीचा आणि उत्पादनाचा खर्च काढून काही पैसे संसाराला मिळणार आहेत.
सध्या बाजारात कांदा एक हजार रुपये प्रति क्विंटल ते 1800 रुपये प्रति क्विंटल पर्यंतच्या सरासरी दरात विकला जात आहे. काही बाजारात याहीपेक्षा अधिकचा सरासरी भाव मिळत आहे. राज्यातील काही बाजारात कमाल बाजारभावाने 2500 रुपये प्रति क्विंटलचा टप्पा देखील गाठला आहे. मात्र अशा बाजारांची संख्या बोटावर मोजण्या इतकीच आहे. अशातच मात्र कांदा उत्पादकांसाठी एक महत्त्वाची आणि थोडीशी आनंदाची बातमी समोर येत आहे.
ती म्हणजे शेतकऱ्यांची दिवाळीपूर्वीच दिवाळी होणार आहे. कारण की आता लवकरच कांद्याचे भाव कडाडणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, या चालू महिन्याच्या अर्थातच ऑगस्ट महिन्याच्या शेवटी किरकोळ बाजारात कांदा तब्बल 60 ते 70 रुपये प्रति किलोपर्यंत विक्री होणार आहे. असा अहवाल एका प्रतिष्ठित संस्थेच्या माध्यमातून नुकताच समोर आला आहे. सध्या कांदा किरकोळ बाजारात 28 रुपये प्रति किलो ते 32 रुपये प्रति किलो यादरम्यान विकला जात आहे.
अर्थातच यामध्ये तब्बल 32 ते 38 रुपयांची वाढ होणार असल्याचे मत व्यक्त होत आहे. क्रिसिल मार्केट इंटेलिजन्स अँड ॲनालिटिक्सने हा अंदाज वर्तवला आहे. क्रिसिल रिपोर्टनुसार, या चालू महिन्याच्या अखेर पासून कांद्याची आवक कमी होणार आहे. आवक कमी होणार यामुळे मागणीची पूर्तता होणार नाही. साहजिकच असं झालं म्हणजे कांद्याच्या भावात वाढ होणार आहे. खरंतर या वर्षी रब्बी हंगामातील म्हणजे उन्हाळी कांद्याच्या पिकाला अवकाळी पावसाचा आणि अतिवृष्टीचा फटका बसला.
यामुळे अनेक भागात कांद्याचे उत्पादन कमी झाले. तर ज्या भागात कांद्याचे उत्पादन हाती आले आहे त्या कांद्याची अवकाळी पावसामुळे टिकवणक्षमता कमी झाली आहे. अशा परिस्थितीत हा कांदा अधिक काळ टिकणार नसल्याचे मत व्यक्त केले जात आहे. शेतकऱ्यांना देखील हीच भीती वाटत आहे. हेच कारण आहे की, शेतकऱ्यांनी रब्बी हंगामातील टिकवणक्षम कांदा देखील लवकरात लवकर विकण्यास पसंती दाखवली आहे.
याच कारणाने मध्यंतरी कांद्याची आवक वाढली होती आणि यामुळे बाजार भाव देखील खालावले होते. मात्र आता गेल्या महिन्यापासून कांद्याच्या भावात वाढ होत आहे. शिवाय आता ऑगस्ट महिन्याच्या अखेर पासून कांद्याची आवक कमी होईल आणि यामुळे दरात आणखी वाढ होणार असा दावा या अहवालात करण्यात आला आहे. सप्टेंबर महिन्यात कांदा दरात तेजी येईल आणि किरकोळ बाजारात कांद्याचे भाव 60 ते 70 रुपये प्रति किलो पर्यंत पोहोचतील असे मत आता व्यक्त होत आहे.
मात्र असे असले तरी ऑक्टोबर महिन्यात खरीप हंगामातील कांदा बाजारात दाखल होईल आणि यामुळे पुन्हा एकदा कांद्याचे बाजार भाव पूर्वपदावर येतील, कमी होतील असे देखील या अहवालात नमूद करण्यात आले आहे. जर हा अहवाल खरा ठरला आणि बाजारभावात वाढ झाली तर निश्चितच शेतकऱ्यांना यामुळे दिलासा मिळण्याची शक्यता आहे. मात्र सर्वसामान्यांचे यामुळे स्वयंपाक घरातील बजेट कोलमडू शकते एवढे नक्की.