Onion Market News : राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी सणासुदीच्या दिवसात एक अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर येत आहे. दिवाळीच्या पूर्वी राज्यातील शेतकऱ्यांसाठी विशेषतः कांदा उत्पादकांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. ती म्हणजे कांद्याच्या बाजारभावात गेल्या काही दिवसांपासून पुन्हा एकदा तेजी दिसू लागली आहे.
खरंतर, राज्यात ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यापर्यंत कांद्याचे बाजार भाव तेजीत होते. मात्र तदनंतर केंद्र शासनाने कांदा निर्यात करण्यासाठी 40% शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाचा परिणाम असा झाला की देशातून मोठ्या प्रमाणात होणारी कांद्याची निर्यात खूपच कमी झाली.
साहजिकच यामुळे देशांतर्गत मालाचा साठा वाढला. देशाअंतर्गत असलेल्या मागणीच्या तुलनेत पुरवठा अधिक होऊ लागला. यामुळे साहजिकच आवकेचा दबाव दरावर आला. कांदा बाजारभावात अचानक घसरण होऊ लागली. मात्र आता पुन्हा एकदा कांद्याच्या दरात वाढ होत आहे.
आज देखील राज्यातील काही महत्त्वाच्या बाजारात कांद्याला पाच हजार रुपये प्रति क्विंटल पेक्षा अधिक भाव मिळाला आहे. विशेष म्हणजे सरासरी बाजार भाव देखील 3 हजार ते ३५०० रुपये प्रतिक्विंटल दरम्यान आहेत. याचा परिणाम म्हणून नवरात्र उत्सवाच्या काळातच शेतकरी बांधवांच्या चेहऱ्यावर कधी नव्हे ते समाधान पाहायला मिळत आहे. यामुळे बळीराजाने सुटकेचा श्वास घेतला आहे.
कोणत्या बाजारात मिळाला विक्रमी दर
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती : पश्चिम महाराष्ट्रातील या महत्त्वाच्या कांदा मार्केटमध्ये आज लाल कांद्याला तब्बल 5,100 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल भाव मिळाला आहे. या मार्केटमध्ये आज 17 हजार 14 क्विंटल लाल कांद्याची आवक झाली होती. या मार्केटमध्ये आज कांद्याला किमान 100, कमाल 5,100 आणि सरासरी 1900 रुपये प्रति क्विंटल एवढा भाव मिळाला होता.
अमरावती फळ आणि भाजीपाला मार्केट : या मार्केटमध्ये आज 390 क्विंटल लोकल कांदा आवक झाली होती. या मार्केटमध्ये आज कांद्याला किमान 1000, कमाल 5000 आणि सरासरी 3000 एवढा भाव मिळाला आहे.
सोलापूर एपीएमसी : लाल कांद्यासोबतच पांढऱ्या कांद्याला देखील सोलापूर एपीएमसी मध्ये चांगला भाव मिळाला आहे. सोलापूर एपीएमसी मध्ये आज पांढऱ्या कांद्याला तब्बल 5,200 प्रतिक्विंटल एवढा कमाल भाव मिळाला आहे.