Onion Market News : केंद्र शासनाने गेल्या काही दिवसांपूर्वी किरकोळ बाजारातील कांद्याच्या वाढत्या किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला. शासनाने कांदा निर्यात करण्यासाठी 40% शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला आहे. या आधी हे शुल्क झिरो टक्के होते.
कांदा निर्यातीसाठी शुल्क आकारण्याचा निर्णय घेतल्याने निर्यात मंदावली आहे. याचा परिणाम म्हणून देशांतर्गत कांद्याचा साठा वाढत आहे. परिणामी बाजारभावात घसरण होत होती. मात्र आता पुन्हा एकदा कांद्याच्या बाजारात थोडीशी तेजी पाहायला मिळाली आहे.
खरंतर कांदा बाजार जून महिन्यापर्यंत पूर्णपणे दबावात होता. मात्र जुलैमध्ये कांद्याच्या दरात वाढ झाली. ऑगस्ट महिन्यात तेजीत आलेले बाजार आणखी तेजीत येणार असे मत व्यक्त केले जात होते. काही बाजार अभ्यासाकांनी सप्टेंबर महिन्यात कांद्याला किरकोळ बाजारात 55 ते 60 रुपये प्रति किलो पर्यंतचा भाव मिळणार असा दावा केला होता.
यामुळे या कांद्याच्या वाढत्या किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र शासनाने सर्वप्रथम नेपाळमधून कांदा आयात करण्यास परवानगी दिली. यानंतर बफर स्टॉक मधील कांदा खुल्या बाजारात विकण्यास परवानगी दिली. बफर स्टॉक मधील जवळपास तीन लाख मेट्रिक टन कांदा हा खुल्या बाजारात विक्रीसाठी दाखल होत आहे.
मात्र याचा फारसा परिणाम होणार नाही असे वाटत असल्याने केंद्रशासनाने कांदा निर्यात कमी व्हावी म्हणून निर्यातीसाठी 40% शुल्क आकारण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला. हा निर्णय सर्वसामान्य ग्राहकांसाठी जरी फायदेशीर असला तरी देखील यामुळे शेतकरी बांधवांचे मोठे नुकसान होणार असे सांगितले जात होते.
परंतु या निर्णयाचा आतापर्यंत फारसा विपरीत परिणाम पाहायला मिळालेला नाही. मात्र जे बाजार भाव आणखी सुधारले असते त्या बाजारभावावर या निर्णयामुळे अंकुश लागला आहे. दरम्यान आज राज्यातील कांदा लिलावासाठी प्रसिद्ध असलेल्या पिंपळगाव बसवंत कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला 3101 रुपये प्रति क्विंटल एवढा विक्रमी भाव मिळाला आहे.
महाराष्ट्र राज्य कृषी उत्पन्न महामंडळाकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार या मार्केटमध्ये आज 22,000 क्विंटल उन्हाळी कांदा आवक झाली. यात कांद्याला 901 एक रुपये प्रति क्विंटल एवढा किमान, 3101 रुपये प्रतिक्विंटल एवढा कमाल आणि 2200 रुपये प्रति क्विंटल एवढा सरासरी भाव मिळाला आहे.