Onion Import Issue : डिसेंबर 2023 मध्ये केंद्रातील सरकारने कांदा निर्यात बंदीचा निर्णय घेतला. हा एक निर्णय राज्यातील कांदा उत्पादकांच्या मुळावर उठला. या निर्णयाने बाजारभावात मोठ्या प्रमाणात घसरण झाली. कांद्याला अगदी रद्दी पेक्षा कमी दर मिळाला. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. परिणामी निवडणुकीत कांद्याचा मुद्दा गाजला अन खऱ्या अर्थाने कांद्यानेचं सत्ताधाऱ्यांना रडकुंडीला आणले.
कांदा हा मुद्दा महाराष्ट्राच्या निवडणुकीत केंद्रस्थानी राहिला आणि लोकसभेत प्रमुख कांदा उत्पादक पट्ट्यातील महायुतीचे जवळपास सर्वच उमेदवार पराभूत झालेत. जळगावातील दोन उमेदवार सोडता उत्तर महाराष्ट्रात कांद्याच्या मुद्द्यामुळे सत्ताधारी महायुतीच्या अनेक बड्या नेत्यांना पराभवाचा सामना करावा लागला.
तथापि केंद्रात पुन्हा एकदा नरेंद्र मोदी सरकार स्थापित झाले. दरम्यान निवडणुकीनंतर कांदा बाजारभावात सुधारणा देखील होऊ लागली आहे. राज्यात उन्हाळी कांद्याला चांगला विक्रमी दर मिळतोय. पण, अशातच गेल्या काही दिवसांपासून अफगाणिस्तानमधून कांदा आयात होत असल्याचा मुद्दा चर्चेस आला आहे.
पाकिस्तान मार्गे अफगाणिस्तान येथून कांद्याची आयात केली जात असल्याचे वृत्त समोर आले आहे. सध्या दिल्ली आणि अमृतसरच्या बाजारांमध्ये अफगाणिस्तानचा कांदा चमकत असून भविष्यात हा कांदा देशातील इतरही बाजारांमध्ये दिसणार अशा चर्चांना हवा दिली जात आहे.
मात्र खरंच अफगाणिस्तानचा कांदा भारतीय बाजारांमध्ये मोठ्या प्रमाणात दाखल होणार का, की अफगाणिस्तान मधला कांदा भारतात आला असल्याने या संधीचे सोने करून व्यापारी वर्गाच्या माध्यमातून दर कमी करण्याचा प्रयत्न होत आहे, असा मोठा सवाल आता उपस्थित केला जातोय.
जाणकारांनी दिलेल्या माहितीनुसार, मध्यंतरी अफगाणिस्तानमधून फक्त तीन ते चार ट्रक कांदा आवक दिल्ली आणि अमृतसरच्या बाजारांमध्ये झाली आहे. तेथील एकूण आवकेच्या तुलनेत ही आवक खूपच कमी आहे.
मात्र जेव्हापासून अफगाणिस्तानचा कांदा दिल्लीच्या बाजारांमध्ये आला आहे तेव्हापासून कांदा आयातीच्या पोकळ चर्चा काही लोकांच्या माध्यमातून जाणूनबुजून रंगवल्या जात आहेत.
मात्र काही जाणकार लोकांनी अफगाणिस्तानच्या कांद्याची प्रतवारी ही भारतीय कांद्याच्या तुलनेत फारच ढासाळलेली आहे. तसेच तेथे अजून हंगाम सुरू झालेला नाही. यामुळे हा कांदा ओला आहे. तसेच या कांद्याची फारच कमी आवक झाली असल्याचे सांगितले आहे.
मात्र राज्यातील व्यापाऱ्यांच्या माध्यमातून या संधीचे सोने केले जाण्याची शक्यता असून अफगाणिस्तानच्या कांद्याची आयात झाल्याने दर पाडण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो अशी भीती व्यक्त होत आहे.
दरम्यान, शेतकऱ्यांनी अफगाणिस्तान मधून होत असलेली कांद्याची आयात पाहता कांदा आयातीवर पूर्णपणे निर्बंध लावले गेले पाहिजेत अशी मोठी मागणी यावेळी केली आहे.