Onion Farming : महाराष्ट्रात कांदा लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. पश्चिम महाराष्ट्रात कांद्याची लागवड सर्वाधिक केली जाते. पुणे जिल्हा म्हटला की कांदा उत्पादनासाठी विशेष ओळखला जातो.
पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुका हा कांद्याचे आगार म्हणून ख्यातीप्राप्त आहे. जुन्नर तालुक्यातील बहुतांशी शेतकरी बांधवांनी यंदा बाजारातून चांगली दर्जाची कांदा बियाणे आणली, विशेष म्हणजे बियाणे चांगली उतरली. शेतकरी बांधवांना देखील चांगल्या प्रतीचे कांदा रोपे तयार होतील अशी आशा होती.
मात्र, परतीच्या पावसाने तालुक्यात त्राहीमाम माजवला आणि कांदा रोपे सडली. तालुक्यात पुरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती, यामुळे कांदा रोपवाटिका चांगल्याच प्रभावीत झाल्या अनेक ठिकाणी शेतकरी बांधवांची कांद्याची रोपे वाहून गेली. यामुळे आता जुन्नर तालुक्यात कांदा रोपांची चणचण भासत आहे. शेतकरी बांधव कोणी कांदा रोपे देते का रोपे म्हणून विचारपूस करू लागले आहेत.
एकंदरीत जुन्नर तालुक्यात यावर्षी उन्हाळी हंगामातील कांदा लागवड लांबली आहे. तालुक्याचा माळशेज पट्टा हा भाग फुरसुंगी उन्हाळी कांदा लागवडीसाठी विशेष ओळखला जातो. या भागातील शेतकरी बांधवांनी आता फुरसुंगी उन्हाळी कांदा लागवड करण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान शेतकरी बांधवांना उन्हाळी कांदा लागवड करण्यासाठी उन्हाळी कांदा रोपांची चणचण भासत आहे.
परतीच्या पावसामुळे माळशेज पट्ट्यातील शेतकरी बांधवांचे फुरसुंगी कांद्याच्या रोपवाटिका खराब झाले असल्याने परिसरात कांदा रोपांची कमतरता जाणवत आहे. आता ज्या शेतकरी बांधवांचे परतीच्या पावसातून कांदा रोप वाचलं आहे तसेच ज्या शेतकरी बांधवांनी नवीन कांदा रोप तयार केले आहे शेतकरी बांधव कांदा लागवडीसाठी पुढे सरसावले आहेत. दरम्यान परिसरातील इतर प्रयोगशील शेतकरी दुसऱ्या शेतकरी बांधवांकडून चढ्या दराने रोपांची खरेदी करून कांदा लागवड करत असल्याचे चित्र आहे.
यावर्षी पावसाळी काळात तसेच परतीच्या काळात चांगला पाऊस बरसला असल्याने कांदा लागवड मोठ्या प्रमाणावर जुन्नर तालुक्यात होणार असल्याचा अंदाज शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान काही प्रयोगशील शेतकरी बांधवांनी यावर्षी जुन्नर तालुक्यात कांदा लागवड कमालीची घटणार असल्याचा दावा केला आहे. शेतकरी बांधवांच्या मते यावर्षी, कांदा लागवड करण्यासाठी कांदा रोपांची चणचण आहे.
कांदा रोपवाटिका मोठ्या प्रमाणात खराब झाले असल्याने शेतकऱ्यांना कांदा लागवड करण्यासाठी कांद्याची रोपे मिळत नाहीत. अशा परिस्थितीत यावर्षी कांदा लागवड घटनार आहे. मात्र जुन्नर तालुक्यात बहुतांशी शेतकरी बांधव कांदा बियाणे थेट पेरून कांदा पेरणी करत असल्याचे चित्र आहे. यामुळे काही शेतकऱ्यांनी यावर्षी कांदा लागवड वाढू देखील शकते असा अंदाज व्यक्त केला आहे. निश्चितच कांदा रोपांची टंचाई शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी सिद्ध होत आहे.