Onion Farming : भारत हा एक प्रमुख कांदा उत्पादक देश आहे. उत्पादनाच्या बाबतीत संपूर्ण जगात आपल्या देशाचा चीननंतर दुसरा क्रमांक लागतो. दुसरीकडे देशातील एकूण कांदा उत्पादनात आपल्या महाराष्ट्राचा पहिला नंबर लागतो. राज्यातील विविध भागांमध्ये कांद्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते.
महाराष्ट्रातील नाशिक जिल्हा तर कांदा उत्पादनासाठी संपूर्ण जगभर प्रसिद्ध आहे. आशिया खंडातील सर्वात मोठी कांदा बाजारपेठ देखील नाशिक जिल्ह्यातच आहे. जिल्ह्यातील लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती ही आशिया खंडातील सर्वात मोठी कांदा बाजारपेठ आहे.
राज्यातील नाशिक समवेतच अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, सोलापूर अशा पश्चिम महाराष्ट्रातील तथा खानदेशातील विविध जिल्ह्यांमध्ये कांद्याची मोठ्या प्रमाणात लागवड होते. मराठवाडा तथा विदर्भ आणि कोकणात देखील कांद्याची कमी अधिक प्रमाणात लागवड केली जाते.
एकंदरीत राज्यातील बहुतांशी शेतकऱ्यांचे या नगदी पिकावर अर्थकारण अवलंबून आहे. कांद्याची लागवड खरीप, लेट खरीप आणि रब्बी अशा तीन हंगामामध्ये केली जाते. दरम्यान आज आपण खरीप हंगामात लागवडीसाठी म्हणजेच पावसाळ्यात शेती करण्यासाठी उपयुक्त कांद्याच्या जातींची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
खरीप हंगामात लागवडीसाठी उपयुक्त कांद्याच्या जाती
खरीप कांद्याच्या प्रमुख जाती
बसवंत-780 : महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये या जातीच्या कांद्याची लागवड केली जाते. लाल कांद्याची ही जात शेतकऱ्यांमध्ये मोठी लोकप्रिय आहे. या जातीचा कांदा आकाराने मोठा आणि गडद लाल रंगाचा असतो. यामुळे बाजारात या जातीच्या कांद्याला चांगला भाव मिळतो. या जातीची लागवड महाराष्ट्रासहित देशातील इतरही अन्य प्रमुख कांदा उत्पादक राज्यांमध्ये होत आहे.
भीमा गडद लाल : या जातीची देखील आपल्या राज्यात मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. हा खरीप हंगामातील एक प्रमुख वाण आहे. ही खरीप कांद्याची जात शेतकऱ्यांमध्ये खूपच लोकप्रिय आहे. या कांद्याचा रंग गडद लाल असतो.
या कांद्याचा आकार मध्यम ते मोठा असतो. जिथे जास्त तापमान आणि जास्त पर्जन्यमान असते त्या ठिकाणी या जातीची लागवड केल्यास चांगले दर्जेदार उत्पादन मिळत असल्याचा दावा तज्ञांनी केला आहे.
अर्का कल्याण : व्यवसायिक शेतीसाठी वर नमूद केलेल्या जातींप्रमाणेच या जातीची देखील मोठ्या प्रमाणात लागवड होते. या कांद्याचा आकार मोठा असतो. याचा देखील रंग गडद लाल असतो. कांद्याची ही एक उत्कृष्ट जात असून यापासून शेतकऱ्यांना चांगले उत्पादन मिळते.
ऍग्रीफाऊंड गडद लाल : पावसाळ्यात कांद्याची लागवड करायची झाल्यास या जातीची लागवड केली जाऊ शकते. पावसाळी हंगामातील ही एक मुख्य जात आहे. या जातीचे कांदे गडद लाल रंगाचे असतात. या जातीपासून हेक्टरी 165 ते 200 क्विंटल पर्यंतचे उत्पादन मिळत असल्याचा दावा केला जात आहे.
विशेष म्हणजे काही शेतकरी 225 क्विंटल पर्यंतचे उत्पादन मिळवत आहेत. योग्य नियोजन केल्यास या जातीपासून 200 क्विंटल पेक्षा अधिकचे उत्पादन मिळवणे शक्य असल्याचे मत तज्ञांनी व्यक्त केले आहे.