Onion Farming : कांदा हे महाराष्ट्रात उत्पादित होणारे एक महत्त्वाचे पीक आहे. खरे तर या पिकाला नगदी पिकाचा दर्जा प्राप्त आहे. मात्र हे पीक नगदी पिकाच्या पुढे आहे. हे पिक सत्ता बनवतेही आणि सत्ता बिघडवतेही. लोकसभा निवडणुकीत सत्ताधाऱ्यांना याचा प्रत्यय आला आहे. लोकसभा निवडणुकीच्या काळात कांद्याचा मुद्दा खूपच चर्चेत राहिला आहे. विशेष म्हणजे अजूनही हा मुद्दा चर्चेतच आहे. लोकसभा निवडणुकीपर्यंत कांद्याला बाजारात अगदीच कवडीमोल दर मिळत होता.
केंद्रातील सरकारने कांदा निर्यात बंदी लागू केली असल्याने याचा फटका शेतकऱ्यांना बसत होता. मात्र निवडणुकीच्या काळात घाईघाईने सरकारने काही अटी आणि शर्ती लावून निर्यात बंदी पुन्हा एकदा सुरू केली. पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते आणि यामुळे शेतकऱ्यांमध्ये सरकार विरोधात मोठी नाराजी होती. या नाराजीचा फटका सत्ताधाऱ्यांना महाराष्ट्रात सर्वाधिक बसला.
राज्यात ज्या ठिकाणी कांद्याचे सर्वात जास्त उत्पादन घेतले जाते त्या ठिकाणी महायुतीचे अनेक उमेदवार पराभूत झालेत. म्हणजेच कांदा हा सत्ता कोणाची येणार हे ठरवतो ? मात्र कांद्याची शेती ही फारच रिस्की आहे. जिगरबाज लोकचं ही शेती करतात असे म्हटले तर काही वावगे ठरणार नाही. याचे कारण म्हणजे काही वेळा कांद्याला चांगला दर मिळतो, अगदीच शेतकरी बांधव मालामाल होऊ शकतात.
पण, कांद्याला काही वेळा अगदीच रद्दीपेक्षा कमी दर मिळतो. यामुळे पिकासाठी आलेला खर्च देखील भरून निघत नाही. याउलट पीक उत्पादित करण्यासाठी जो खर्च केलेला असतो तो खर्च शेतकऱ्यांना स्वतःची पदरमोड करून भागवावा लागतो. म्हणजे कांदा केव्हा वांदा करेल हे काय सांगता येत नाही. यामुळे याची लागवड जिगरबाज शेतकऱ्यांकडूनच केली जाते. मातीत पैसा ओतावा लागतो अन ब्लाइंड गेम खेळावा लागतो.
पण, मराठवाड्यातील एका शेतकऱ्याने चक्क 33 एकरावर कांद्याची लागवड केली आहे. विशेष म्हणजे यासाठी या शेतकऱ्याला तब्बल 25 लाख रुपयांचा खर्च आला आहे. यामुळे सध्या संपूर्ण महाराष्ट्रात मराठवाड्यातील या प्रयोगशील शेतकऱ्याचे चर्चा रंगली आहे. या जिगरबाज शेतकऱ्यांवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
पण आता हा कांदा या शेतकऱ्याला तारणार का हा मोठा प्रश्न आहे. लाखो रुपयांचा खर्च करून बीडच्या या शेतकऱ्याने कांदा लागवड केली खरी मात्र बाजार भाव कसा मिळेल यावरचं त्याचे भवितव्य अवलंबून राहणार आहे. पंकज पठाडे या युवा शेतकऱ्यानी ही डेरिंग केली आहे.
खरे तर कांदा बाजाराचा लहरीपणा पाहता एक-दोन एकरावर कांदा लागवड करण्यासाठी देखील फार विचार केला जातो. तर दुसरीकडे पठाडे यांनी तब्बल 33 एकरावर कांदा लागवड केली आहे. गेल्या दहा दिवसांपासून शंभरहून अधिक मजूर त्यांच्या शेतात कांदा लागवडीच्या कामात गुंतलेले पाहायला मिळत आहेत.
33 एकरावर कांदा लागवड करण्यासाठी आवश्यक रोपांसाठी सात ते आठ एकरावर रोपवाटिका तयार करण्यात आली होती. या रोपवाटिकेच्या रोपांची आता त्यांच्या शेतात लागवड केली जात आहे. आत्तापर्यंत 25 एकराच्या आसपास जमिनीवर कांदा लागवड पूर्ण झाली असून उर्वरित जमिनीवरही लवकरात लवकर कांदा लागवड पूर्ण होणार आहे.
फक्त लागवडीसाठी त्यांना जवळपास 15 लाख रुपयांपर्यंतचा खर्च आला आहे. या पिकाच्या सिंचनासाठी देखील त्यांना लाखो रुपयांचा खर्च करावा लागला आहे. सिंचनासाठी जवळपास दहा ते बारा लाख रुपयांपर्यंतचा खर्च त्यांना आला आहे. एकूण खर्च त्यांना 25 ते 27 लाख रुपये एवढा येणार अशा चर्चा सुरू आहेत.
मात्र या युवा शेतकऱ्याला या पिकातून तब्बल 90 लाख रुपयांपर्यंतची कमाई होऊ शकते अशी आशा आहे. नक्कीच पठाडे यांनी लाखो रुपयांचा खर्च करून 33 एकरावर कांदा लागवड करण्याचा घेतलेला निर्णय सध्या संपूर्ण राज्यभर चर्चेचा विषय ठरत आहे.