Onion Farming : कांदा हे महाराष्ट्र राज्यात उत्पादित होणारे एक महत्त्वाचे नगदी पीक आहे. या पिकाची लागवड राज्यातील बहुतांशी भागांमध्ये केली जाते. तथापि, कांदा उत्पादनासाठी नाशिक जिल्हा विशेष ओळखला जातो. जिल्ह्यातील कसमादे पट्टा अर्थातच कळवण, सटाणा, मालेगाव, देवळा या तालुक्यातील बहुतांशी शेतकरी बांधव मोठ्या प्रमाणात कांदा लागवड करतात. येथील शेतकऱ्यांचे अर्थकारण हे कांद्यावर अवलंबून आहे.
यासोबतच पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, अहमदनगर इत्यादी जिल्ह्यांमध्ये कांदा लागवड पाहायला मिळते. खानदेशात देखील मोठ्या प्रमाणात कांदा पिकवला जातो. दरम्यान पुणे जिल्ह्यातील एका प्रयोगशील शेतकऱ्याने यंदाच्या भीषण दुष्काळातही कांद्याच्या पिकातून चांगले दर्जेदार अन विक्रमी उत्पादन मिळवून दाखवले आहे.
खरे तर गेल्या वर्षी जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या पावसाळी काळात खूपच कमी पाऊस झाला. महाराष्ट्रातील अनेक भागात दुष्काळ सदृश्य परिस्थिती तयार झाली. कमी पावसामुळे यंदा उन्हाळा अर्धा संपला असतानाच राज्यातील बहुतांशी धरणे कोरडी ठाक झाली आहेत.
धरणांनी तळ गाठला आहे विहिरींमध्ये तर पाणीच उरले नाही. यामुळे अनेक ठिकाणी पाणीबाणी पाहायला मिळत आहे. राज्यातील अनेक भागात पिण्याच्या पाण्यासाठी देखील नागरिकांना मोठी मेहनत घ्यावी लागत आहे.
मात्र अशा या विपरीत परिस्थितीत आणि दुष्काळ असतानाही पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील एका शेतकऱ्याने एकरी 15 टन कांद्याचे उत्पादन मिळवून दाखवले आहे. पुरंदर तालुक्यात भीषण दुष्काळी परिस्थितीमुळे स्वतः कांदा पिकवणाऱ्या शेतकऱ्यांनाच बाजारातून कांदा विकत आणून खावा लागतोय.
तथापि तालुक्याच्या पश्चिमेकडील भागात काही ठिकाणी गेल्या वर्षी पावसाळी काळात थोड्याफार प्रमाणात पाऊस झाल्यामुळे पाणी पातळी टिकून राहिली होती. कोडीत व गराडे परिसरात अशी परिस्थिती पाहायला मिळाली. या भागात पावसाळी काळात थोडाफार पाऊस झाल्यामुळे गराडे येथील मारुती घारे या प्रयोगशील शेतकऱ्याने तीन एकरात चांगले विक्रमी उत्पादन मिळवले आहे.
या कामी त्यांची अर्धांगिनी मधुमती घारे यांनी देखील त्यांना मोलाचे सहकार्य केले आहे.घारे यांनी दिलेल्या माहितीनुसार, जमिनीची मशागत पूर्ण झाल्यानंतर त्यांनी कांदा लागवडीसाठी शेणखताचा वापर केला. शेणखताचा जास्तीचा वापर केल्याने उत्पादनात वाढ होते त्यामुळे त्यांनी शेणखताचा अधिकार अधिक वापर केला.
नंतर मग त्यांनी कांद्याच्या लागवडीसाठी बेड तयार केले. त्यांच्या परिसरात पावसाळी काळात पाऊस झाला होता, मात्र खूपच कमी पाऊस झाला होता, यामुळे पाणी पुरेल की नाही याची त्यांना भीती होती. परिणामी पाण्याचे योग्य नियोजन करणे हे त्यांच्यापुढे एक मोठे आव्हान होते. दरम्यान त्यांनी पाण्याच्या नियोजनासाठी ठिबक सिंचन प्रणालीचा वापर केला.
पंधरा दिवसाच्या अंतराने त्यांनी ठिबक सिंचनाद्वारे कांद्याच्या पिकाला पाणी दिले. त्यांनी रासायनिक खतांचा खूपच कमी वापर केला. गेल्या महिन्यात त्यांचा कांदा हा काढणी योग्य झाला. कांद्याचा आकार आणि रंग पाण्याच योग्य नियोजन केल्यामुळे आणि मोठ्या प्रमाणात शेणखताचा वापर केल्यामुळे खूपच उत्कृष्ट असल्याचे त्यांनी सांगितले.
विशेष म्हणजे तीन एकरात त्यांना 800 ते 900 पिशवी अर्थात 40 ते 45 टन एवढे विक्रमी उत्पादन मिळालेले आहे. दुष्काळी काळात मिळवलेले हे उत्पादन निश्चितच वाखाण्याजोगे आहे. सध्या कांद्याला अपेक्षित भाव मिळत नाहीये यामुळे त्यांनी कांदा साठवणुकीवर विशेष लक्ष केंद्रित केलेले आहे.