Okra Farming : भेंडी हे एक प्रमुख भाजीपाला पीक आहे. बाजारात भेंडीला बारा महिने मागणी असते. भेंडी मध्ये असणारे औषधी गुणधर्म आरोग्यासाठी खूपच फायदेशीर असून यामुळे अनेकजण भेंडीच्या सेवनाला पसंती दाखवतात. अशा परिस्थितीत भेंडीची शेती शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरत आहे.
महाराष्ट्रासहित देशातील अनेक राज्यांमध्ये भेंडीची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. जे शेतकरी बांधव भाजीपाल्याची लागवड करतात ते आवर्जून भेंडीची शेती करतात. यामुळे शेतकऱ्यांचे उत्पादन वाढावे या अनुषंगाने कृषी संशोधकांनी भेंडीच्या अनेक सुधारित जातीं विकसित केल्या आहेत.
दरम्यान आज आपण कृषी संशोधकांनी विकसित केलेल्या अशाच काही भेंडीच्या सुधारित जातींची माहिती जाणून घेणार आहोत. या भेंडीच्या सुधारित जातींची लागवड केल्यास शेतकऱ्यांना चांगले विक्रमी उत्पादन मिळू शकणार आहे.
भेंडीच्या सुधारित जाती आणि त्यांच्या विशेषता
परभणी क्रांती – महाराष्ट्रात या जातीची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. भेंडीची ही जात विविध रोगास प्रतिकारक असल्याचा दावा कृषी संशोधकांनी केला आहे. कृषी तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, या जातीच्या भेंडीची लागवड केल्यानंतर सुमारे 50 दिवसांनी फळधारणा होते.
म्हणजे फळे येऊ लागतात. या जातीच्या भेंडीचा रंग गडद हिरवा असतो. तसेच याची लांबी १५-१८ सेमी एवढी असते. यापासून शेतकऱ्यांना चांगले विक्रमी उत्पादन मिळू शकते.
अर्का अनामिका – भेंडीची ही एक सुधारित जात आहे. या जातींचे पीक यलो मोझॅक या रोगाशी लढण्यास सक्षम असल्याचा दावा तज्ञांनी केला आहे. या जातीची भेंडी ही मऊ असते. उन्हाळ्यात आणि पावसाळ्यात या जातीचे पीक घेतले जात असते.
पंजाब पद्मिनी – भेंडीची ही सुद्धा एक सुधारित जात आहे. हा वाण पंजाब विद्यापीठाने विकसित केला आहे. या जातीची भेंडी ही सरळ आणि गुळगुळीत अशी असते.
चवीला या जातीची भेंडी खूपच रुचकर लागते. बाजारात या भेंडीला चांगली मागणी असून शेतकऱ्यांना यापासून चांगले उत्पादन देखील मिळत आहे.
पुसा सावनी – भेंडीची हा वाण शेतकऱ्यांमध्ये खूपच लोकप्रिय आहे. याचे कारण म्हणजे या जातीचा वाण हा तीनही हंगामात उत्पादित केला जाऊ शकतो.
तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार जर याची लागवड पावसाळ्यात केली गेली तर या जातीचे पीक 60 ते 65 दिवसात परिपक्व होते. यातून शेतकऱ्यांना चांगले उत्पादन सुद्धा मिळते.