October To December Havaman Andaj : जून ते सप्टेंबर हा चार महिन्यांचा काळ म्हणजेच नैऋत्य मान्सूनचा काळ. यंदा या पावसाळ्याच्या काळात महाराष्ट्रात सरासरीपेक्षा जास्तीचा पाऊस झाला आहे. सर्वाधिक पाऊस मध्य महाराष्ट्र विभागात झाला आहे. कोकण, मराठवाडा आणि विदर्भात देखील या काळात सरासरी पेक्षा जास्तीच्या पावसाची नोंद करण्यात आली आहे.
गेल्या महिन्यात मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू झाला आहे. येत्या काही दिवसांनी मान्सून संपूर्ण देशातून माघार घेणार आहे. अशातच भारतीय हवामान खात्याने ऑक्टोबर ते डिसेंबर दरम्यान देशातील हवामान कसे राहणार, या काळात कोणत्या भागात जोरदार पाऊस पडणार, महाराष्ट्रात पाऊसमान कसे राहणार? या संदर्भात महत्त्वाची माहिती दिली आहे.
देशात ऑक्टोबर महिन्यापासून ईशान्य मान्सूनला सुरुवात होत असते. नैऋत्य मान्सूनचा काळ संपून आता ईशान्य मान्सूनला सुरुवात होणार आहे. ऑक्टोबर ते डिसेंबर यादरम्यान ईशान्य मान्सूनचा काळ असतो आणि या कालावधीत देशातील दक्षिणेकडील राज्यांमध्ये जोरदार पाऊस होत असतो.
यंदा या काळात दक्षिण भारतात चांगल्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दक्षिण भारतातील सर्वच राज्यांमध्ये या काळात सरासरीपेक्षा जास्तीचा पाऊस पडणार, जवळपास 112 टक्क्यांपेक्षा अधिकचा पाऊस पडणार असा अंदाज आयएमडीने दिला आहे.
महत्त्वाचे म्हणजे आपल्या महाराष्ट्रात देखील या काळात अर्थातच ऑक्टोबर ते डिसेंबर दरम्यान सरासरी पेक्षा जास्त पाऊस राहणार असे हवामान खात्याने स्पष्ट केले आहे. या चालू ऑक्टोबर महिन्याबाबत बोलायचं झालं तर या काळात देशात 115 टक्क्यांपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रातही या महिन्यात सरासरी पेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे. राज्यातील मराठवाडा विभाग वगळता म्हणजेच मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि कोकणात या चालू महिन्यात सरासरी पेक्षा जास्त पाऊस पडणार असे आयएमडीने आपल्या नवीन बुलेटिन मध्ये स्पष्ट केले आहे.
आम्ही आपणास सांगू इच्छितो की नैऋत्य मोसमी वारे म्हणजेच मान्सून देशातून गेल्यानंतर दक्षिण भारतातील तमिळनाडू, आंध्र प्रदेशचा सीमावर्ती भाग, रायलसीमा, केरळ, दक्षिणअंतर्गत कर्नाटक या भागात ईशान्य मोसमी वारे सक्रिय होत असतात.
हे वारे बंगालच्या उपसागरावरून बाष्प घेऊन येत असल्याने दक्षिण भारतात पाऊस होतो. यंदा मात्र दक्षिण भारतात या काळात सरासरी पेक्षा जास्त पाऊस पडणार आहे. देशात या काळात जवळपास 112 टक्के अधिक पाऊस पडण्याचा अंदाज देण्यात आला आहे.