New Digital Expressway : गेल्या काही वर्षांपासून देशात रस्ते वाहतूक, रेल्वे वाहतूक आणि विमान वाहतूक मजबूत करण्यावर अधिक भर दिला जात आहे. देशात 2014 मध्ये सत्तेत आलेल्या मोदी सरकारने आपल्या देशात रस्ते आणि महामार्ग बांधणीत प्रचंड काम केले आहे.
केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या दूरदृष्टीकोनातून देशभरात विविध महामार्गांची कामे केली जात आहेत. दरम्यान पुढील वर्षी अर्थातच 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या कामांना अलीकडे आणखी वेग देण्यात आला आहे.
केंद्र सरकार संपूर्ण भारतवर्षात रस्त्यांचे जाळे मजबूत करण्यात व्यस्त आहे. आपल्या महाराष्ट्रात देखील विविध रस्ते विकासाची कामे सुरू आहेत. रस्त्यांचे भले मोठे नेटवर्क तयार केले जात आहे. जिल्ह्या-जिल्ह्यांना आणि शहरा शहरांना जोडण्यासाठी महामार्ग उभारले जात आहेत.
केंद्र शासनाच्या माध्यमातून भारतमाला परियोजनांतर्गत तीन हजार किलोमीटर लांबीचे ग्रीन फील्ड एक्सप्रेस वे तयार केले जात आहेत. आपल्या राज्यातही या परीयोजनेअंतर्गत काही महामार्गांचे कामे हाती घेण्यात आली आहेत. दरम्यान आता भारतीय राष्ट्रीय महामार्ग देशात डिजिटल महामार्ग विकसित करणार असल्याची माहिती समोर आली आहे.
देशात आता डिजिटल महामार्गचे नेटवर्क मजबूत केले जाणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार NHAI आर्थिक वर्ष 2024-25 पर्यंत देशभरात अंदाजे 10,000 किमी लांबीचे ऑप्टिकल फायबर केबल म्हणजे OFC चे फ्रेमवर्क विकसित करण्याच्या दिशेने काम करत आहे. या पार्श्वभूमीवर देशात आता डिजिटल महामार्ग तयार होणार आहेत.
म्हणजेच असे महामार्ग ज्या महामार्गात ऑप्टिकल फायबर केबल देखील राहणार आहे. नॅशनल हायवेज लॉजिस्टिक मॅनेजमेंट लिमिटेड (NHLML), हाती आलेल्या माहिती नुसार, NHAI ची संपूर्ण मालकी असलेली SPV, OFC चे फ्रेमवर्क तयार करण्यासाठी राष्ट्रीय महामार्गांवर एकात्मिक प्रवेश कॉरिडॉर विकसित करून डिजिटल महामार्ग तयार करणार आहेत.
दिल्ली-मुंबई द्रुतगती महामार्ग आणि हैदराबाद-बंगळुरू महामार्ग प्रायोगिक तत्त्वावर डिजिटल महामार्ग विकसित करण्यासाठी चिन्हित करण्यात आला आहे. दिल्ली ते मुंबई दरम्यान विकसित होणारा द्रुतगती महामार्ग देशातील पहिला डिजिटल महामार्ग म्हणून ओळखला जाणार आहे.
या डिजिटल कॉरिडोर अंतर्गत OFC नेटवर्क विकसित होणार आहे. जे देशभरातील दुर्गम भागात इंटरनेट कनेक्टिव्हिटी प्रदान करणार आहे. 5G आणि 6G सारख्या आधुनिक दूरसंचार तंत्रज्ञानाच्या रोलआउटला यामुळे गती मिळणार आहे. अलीकडेच उद्घाटन झालेल्या दिल्ली-मुंबई द्रुतगती मार्गाच्या 246 किमी लांबीच्या दिल्ली-दौसा-लालसोट विभागामध्ये ऑप्टिकल फायबर केबल टाकण्यासाठी तीन मीटर रुंद समर्पित कॉरिडॉर तयार करण्यात आला आहे.
हे या प्रदेशात 5G नेटवर्कच्या परिचयासाठी आधार म्हणून काम करणार आहे. राष्ट्रीय महामार्गावर ओएफसी टाकण्याचे काम सुरू झाले असून सुमारे एका वर्षभरात ते पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.