Neul Uran Railway News : उरणकरांना 31 मार्च अखेर नेरूळ उरण रेल्वे मार्ग प्रकल्पाची भेट मिळणार अशी घोषणा करण्यात आली होती. मात्र आता 31 मार्च उलटून गेली आहे. तरीही हा रेल्वे मार्ग प्रकल्प सुरू झाला नाही. यामुळे ही घोषणा हवेतच विरली असल्याने पुन्हा एकदा उरणकरांच्या आशेवर पाणी फेरण्याचे काम झाले आहे. खरं पाहता गेल्या पन्नास वर्षांपासून नेरूळ ते उरण हा रेल्वे मार्ग प्रकल्पाची प्रतीक्षा आहे.
हा रेल्वे मार्ग प्रकल्प उरणकरांसाठी अति महत्त्वाचा असून गेल्या काही वर्षात या रेल्वे मार्ग प्रकल्पाच्या कामाला गती देण्याचे काम झाले आहे. 27 किलोमीटर लांबीचा हा रेल्वे मार्ग प्रकल्प एकूण दोन टप्प्यात आता सुरू करण्याचे नियोजन आहे. या पार्श्वभूमीवर या रेल्वे मार्ग प्रकल्पाचा पहिला टप्पा अर्थातच नेरूळ ते खारकोपर पर्यंतचे काम याआधी पूर्ण झाले असून हा पहिला टप्पा प्रवाशांच्या सेवेत दाखल देखील झाला आहे.
आता या रेल्वे मार्गाचा दुसरा टप्पा अर्थातच खारकोपर ते उरण 31 मार्च 2023 रोजी सुरू होईल असं सांगितलं जात होतं. या पार्श्वभूमीवर या रेल्वेमार्गाची नुकतीच पाहणी देखील रेल्वेच्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून करण्यात आली. अधिकाऱ्यांकडून हा रेल्वे मार्ग प्रकल्प मार्च अखेर सुरूच होईल असा दावा केला गेला होता. मात्र हा 1786 कोटी रुपयांच्या खर्चाचा नेरुळ ते उरण रेल्वे मार्ग प्रकल्प अद्याप पूर्णपणे सुरू झाला नाही. आता याचा दुसरा टप्पा नेमका केव्हा सुरू होतो हा प्रश्न पुन्हा निर्माण झाला आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, या दुसऱ्या टप्प्यातील बहुतांश मोठी कामे पुर्णत्वास गेलेली आहेत.
तरी महत्त्वाची काही कामे अद्याप पूर्ण झालेली नाही. अनेक किरकोळ कामे अपूर्ण आहेत. यामुळे या रेल्वे मार्गावर प्रवासी वाहतूक सुरू करण्यासं आणखी काही कालावधी खर्च होणार आहे. या ठिकाणी विशेष बाब अशी की, प्रवासी वाहतूक सुरू करण्यात विलंब होणार असल्याची कबुली मध्यरेल्वेचे जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी दिली आहे. परंतु असे असले तरी हा दुसरा टप्पा प्रवाशांसाठी खुला करणे हेतू युद्धपातळीवर काम सुरू आहे.
यामुळे 31 मार्च ही डेडलाईन हुकली असली तरी देखील आगामी काही महिन्यात या मार्गावर रेल्वे धावेल असा आशावाद व्यक्त होत आहे. तूर्तास उरणकरांच्या आनंदावर विरजण पडण्याचे काम यामुळे मात्र झाले आहे. आता मात्र हा दुसरा टप्पा केव्हा सुरू होईल याबाबत अधिकाऱ्यांच्या माध्यमातून कोणतीच माहिती देण्यात आलेली नाही. तरी देखील येत्या एक ते दोन महिन्यात हा रेल्वे मार्ग प्रकल्प मार्गी लागू शकतो आणि प्रवासी वाहतूक यावर सुरू होईल असा आशावाद यानिमित्ताने व्यक्त होत आहे.