Navi Mumbai News : नवी मुंबईकरांचा बारा वर्षांचा वनवास काल अर्थातच 17 नोव्हेंबर 2023 रोजी संपला आहे. खरंतर नवी मुंबई शहरात मेट्रोची पायाभरणी होऊन जवळपास बारा वर्षांचा काळ उलटला असतानाही शहरात मेट्रो धावत नव्हती.
यामुळे ज्याप्रमाणे प्रभू श्रीरामांना 14 वर्षांचा वनवास भोगावा लागला तसाच वनवास नवी मुंबई शहरातील नागरिकांना मेट्रोसाठी भोगावा लागणार की काय असे बोलले जात होते. पण 14 वर्षे पूर्ण होण्यापूर्वीच नवी मुंबईकरांना मेट्रोची भेट मिळाली आहे.
काल अर्थातच 17 नोव्हेंबरला नवी मुंबई शहरातील बेलापूर ते पेंधार या पहिल्या मेट्रो मार्गाला सुरू करण्यात आले आहे. खरे तर बेलापूर ते पेंढार या मेट्रो मार्गाचे काम केव्हाच पूर्ण झाले होते. परंतु हा मेट्रो मार्ग उद्घाटनाअभावी लाल फितीत अडकला होता.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या व्यस्त कार्यक्रमांमुळे या मार्गाचे उद्घाटन करण्यासाठी पंतप्रधान कार्यालयाकडून वेळ मिळत नव्हता. माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तारखा मिळत नसल्याने सिडकोला हा मेट्रो मार्ग सुरू करता येत नव्हता.
यामुळे नवी मुंबई शहरातील नागरिकांमध्ये शासनाविरोधात डे बाय डे नाराजी वाढत होती. विशेष म्हणजे लोकहिताचा प्रकल्प तयार असताना त्याचा नागरिकांना उपयोग होत नसल्याने विरोधकांनी देखील हा मुद्दा चांगलाच लावून धरला होता. विरोधकांनी शासनाला या मुद्द्यावर धारेवर धरले.
परिणामी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा मेट्रो मार्ग उद्घाटना विनाच थेट लोकांसाठी सुरू करण्याच्या सूचना सिडकोला दिल्यात. यानुसार, सिडकोकडून काल अर्थात शुक्रवारी हा मेट्रो मार्ग नवी मुंबई शहरातील नागरिकांसाठी खुला करण्यात आला आहे.
काल दुपारी तीन वाजता या मार्गावर पहिल्यांदा मेट्रो धावली आहे. यामुळे एका तपानंतर नवी मुंबईकरांचे स्वप्न प्रत्यक्षात खरे उतरले असल्याचे पाहायाला मिळाले. दरम्यान नवी मुंबई शहरातील या मेट्रोमार्गासारखीच परिस्थिती खारकोपर ते उरण या रेल्वे मार्गाची झाली आहे.
खरंतर, खारकोपर ते उरण हा मार्ग नेरूळ ते उरण या रेल्वे मार्गाचा दुसरा टप्पा आहे. नेरूळ ते उरण हा रेल्वे मार्ग आपल्यापैकी अनेकांचा जन्मही झालेला नसेल तेव्हा मंजूर करण्यात आला होता.
परंतु 25 वर्षांपेक्षा अधिक काळ हा मार्ग रखडला आहे. विविध कारणांमुळे या रेल्वे मार्गाच्या कामात अडथळे निर्माण झाले आहेत. आता मात्र अडथळ्यांची शर्यत पार करून हा रेल्वे मार्ग पूर्ण झाला आहे. पण हा रेल्वे मार्ग देखील उद्घाटनाअभावी लाल फितीत अडकला आहे.
खरंतर या रेल्वे मार्गाचा पहिला टप्पा 2018 मध्ये सुरू झाला आहे. या रेल्वे मार्गाचा नेरूळ ते खारकोपर हा मार्ग 2018 मध्ये वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. आता खारकोपर ते उरण हा रेल्वे मार्ग लवकरात लवकर सुरू केला पाहिजे अशी मागणी उरणकरांच्या माध्यमातून केले जात आहे.
ज्या पद्धतीने बेलापूर ते पेंधार हा मेट्रो मार्ग उद्घाटना विनाच सुरू करण्यात आला आहे त्याच धर्तीवर खारकोपर ते उरण हा रेल्वे मार्ग सुरू करून त्यावर लवकरात लवकर लोकल सेवा चालू केली पाहिजे अशी मागणी नागरिकांच्या माध्यमातून यावेळी उपस्थित करण्यात आली आहे.
यामुळे आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याबाबत सकारात्मक निर्णय घेतात का आणि या मार्गावर देखील उद्घाटनाविनाच लोकल सेवा सुरू होते का हे पाहण्यासारखे राहणार आहे.