Navi Mumbai Cidco House : शिक्षण पूर्ण झालं, नोकरी लागली की सर्वप्रथम डोळ्यापुढे एकच ध्येय असतं अन ते म्हणजे आपले हक्काचे एक घर बनवणे. मात्र घर खरेदी करणे अलीकडील काही वर्षांमध्ये अवघड बाब बनली आहे. विविध कारणांमुळे घरांच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. मुंबई आणि नवी मुंबई सारख्या शहरांमध्ये सर्वसामान्य नागरिकांसाठी घर घेणे तर दुरापास्त गोष्ट बनत चालली आहे.
अशा या परिस्थितीत मात्र सिडको आणि म्हाडा सारख्या संस्था सर्वसामान्यांना आधार देत आहेत. या संस्थांच्या माध्यमातून उपलब्ध होणाऱ्या परवडणाऱ्या घरांमुळे आतापर्यंत लाखो लोकांचे घर खरेदीचे स्वप्न पूर्ण झाले आहे. दरवर्षी या संस्थांच्या माध्यमातून हजारो घरांसाठी लॉटरी जाहीर केली जात असते.
दरम्यान, नवी मुंबईत आपले हक्काचे घर असावे असे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी सिडको प्राधिकरण लवकरच एक गुड न्यूज देणार आहे. विजयादशमीच्या मुहूर्तावर सिडको प्राधिकरणाकडून तब्बल 40000 घरांसाठी लॉटरी काढली जाणार असल्याची बातमी समोर आली आहे.
खरे तर सिडकोची लॉटरी विजयादशमीच्या मुहूर्तावर निघणार असे वृत्त गेल्या काही दिवसांपासून प्रसारमाध्यमांमध्ये जळकत आहे. मात्र ही लॉटरी नेमकी कधी जाहीर होणार? या लॉटरी मध्ये समाविष्ट असणाऱ्या घरांची विक्री कशी होणार? याच संदर्भात आज आपण माहिती पाहणार आहोत.
लॉटरी कधी जाहीर होणार?
मिळालेल्या माहितीनुसार, गांधी जयंतीच्या दिवशी अर्थातच दोन ऑक्टोबरला सिडको प्राधिकरणाकडून लॉटरी जाहीर केली जाणार आहे. सिडकोचे नवनियुक्त अध्यक्ष संजय शिरसाठ यांनी दोन ऑक्टोबर च्या आसपास ही लॉटरी जाहीर होणार असे संकेत दिले आहेत. म्हणजेच सिडकोच्या या हजारो घरांसाठीची लॉटरी विजयादशमीच्या आधीच जाहीर होण्याची शक्यता आहे.
कशी असणार लॉटरी?
सिडकोच्या या आगामी लॉटरीमध्ये समाविष्ट असणाऱ्या घरांची विक्री ही निवडा तुमच्या आवडीचे घर या संकल्पने अंतर्गत केली जाणार आहे. या उपक्रमा अंतर्गत सिडको प्राधिकरण आगामी सोडती मध्ये समाविष्ट असणाऱ्या घरांची विक्री प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या योजनेअंतर्गत करणार आहे.
त्यामुळे अर्जदारांना आपल्या आवडीच्या ठिकाणी घर निवडता येणार आहे. महत्त्वाचे म्हणजे या घरांच्या किमती सर्वसामान्यांच्या बजेटमध्ये असतील असा दावा देखील होत आहे. नक्कीच या घरांच्या किमती जर सर्वसामान्यांना परवडणाऱ्या असतील तर या आगामी सोडतीला नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे.
कोणत्या घरांचा समावेश राहणार
सिडको प्राधिकरणाच्या माध्यमातून नवी मुंबईत 27 ठिकाणी तब्बल 67 हजार घरे विकसित केली जात आहेत. विविध प्रकल्प अंतर्गत विकसित होत असणाऱ्या या घरांपैकी पहिल्या टप्प्यात 43 हजार घरे बांधून रेडी होणार असून या घरांना महारेराकडून परवानगी देखील मिळालेली आहे. सध्या या घरांचे बांधकाम प्रगतीपथावर असून विजयादशमीच्या आधीच यापैकी 25000 घरे विक्रीसाठी उपलब्ध होणार आहेत.
तळोजा, द्रोणागिरी, कळंबोली, करंजाडेसह मानसरोवर, खारघर, जुईनगर आणि वाशीसह विविध भागातील घरांचा या लॉटरीमध्ये समावेश राहणार आहे. यातील बहुतांशी घरे ही आर्थिक दृष्ट्या दुर्बल आणि अल्प उत्पन्न गटातील नागरिकांसाठी राहतील. त्यामुळे सर्वसामान्यांचे घर खरेदीचे स्वप्न पूर्ण होणार आहे.